संविधान 80 वेळा बदलणाऱ्या काँग्रेसचा भाजपा विरोधात अपप्रचार, भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांचा हल्लाबोल

7

गोव्यातल्या काँग्रेस उमेदवाराने गोव्यात भारतीय संविधान लागू करू नये, अशी मागणी केली आहे, तर कर्नाटकातील एका काँग्रेस नेत्याने अशीच मागणी काही दिवसा पूर्वी केली होती. यावरून काँग्रेसलाच संविधानाविषयी आदर नसल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, भाजपा उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष डॉ.संजय पाण्डेय, प्रवक्ते अतुल शाह यावेळी उपस्थित होते. काँग्रेस ने सत्ताकाळात संविधानात 80 वेळा बदल केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा यांच्यावर टीका करण्यासारखे काहीच उरले नसल्याने काँग्रेस नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे हे संविधान बदलासाठी भाजपाला 400 पेक्षा अधिक जागा हव्या आहेत, असा अपप्रचार करत आहेत, असा हल्ला तावडे यांनी चढवला .

 मोदी सरकारच्या कार्यकाळात संविधान दिवस साजरा केला जाऊ लागला, भाजपाचे संकल्पपत्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी प्रसिद्ध झाले. यावरून भारतीय जनता पार्टीचा डॉ.आंबेडकर आणि संविधानाबद्दलचा आदर स्पष्ट झाला आहे असेही तावडे यांनी सांगितले.

तावडे म्हणाले की, गोव्यातील काँग्रेस उमेदवाराने गोवा राज्याला भारतीय संविधान लागु करू नये अशी मागणी जाहीरपणे केली आहे. राहुल गांधी यांच्या अनुमतीनेच आपण ही मागणी करत आहोत असे या उमेदवाराने सांगितले आहे. कर्नाटकातील एका काँग्रेस नेत्याने असेच वक्तव्य केले होते, यावरून काँग्रेसला संविधानाचा आदर करण्याची इच्छा नाही हेच स्पष्ट झाले आहे

यावेळी तावडे यांनी राज्यातील प्रचाराच्या घसरलेल्या पातळी बाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख, शरद पवार हे नेतेही परस्परांवर टीका करत असत. मात्र त्यावेळी प्रचाराची पातळी घसरत नव्हती.

मोदी सरकारच्या गेल्या 10 वर्षाच्या कार्यकाळात महाराष्ट्राला भरभरून मिळाले आहे, असे स्पष्ट करत तावडे यांनी गेल्या 10 वर्षात महाराष्ट्राला केंद्राकडून काय मिळाले याचा हिशोब सादर केला. ते म्हणाले की ‘युपीए’ सरकारच्या तुलनेत केंद्राकडून महाराष्ट्राला मिळालेल्या अनुदानात 253 टक्क्यांनी वाढ झाली, करांच्या परताव्यापोटी मिळणाऱ्या रकमेत 33 टक्के वाढ झाली. 2020-2021 पासून 11 हजार 711 कोटी एवढे बिनव्याजी कर्ज मिळाले, राज्यात शहरी आणि ग्रामीण भागात 27 लाख घरे पंतप्रधान आवास योजनेखाली बांधली गेली. अशा अनेक गोष्टींचा विचार करून मतदार भाजपा आणि महायुतीला भरभरून मतदान करतील असा विश्वास तावडे यांनी व्यक्त केला.

तावडे म्हणाले की, महाराष्ट्रात आयुष्मान भारत योजनेचे 2.50 कोटी लाभार्थी आहेत, राज्यात जनधन योजनेत 3 कोटी 42 लाख खाती उघडली गेली. मुद्रा योजनेत महाराष्ट्रात 2 लाख 33 हजार कोटी एवढे कर्ज वाटप झाले, राज्यात 8 लाख विक्रेत्यांना स्वनिधी योजनेत कर्ज मिळाले. 75 लाख जणांच्या घरात जलजीवन योजनेद्वारे पाणी मिळाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.