देशातील सर्वात मोठ्या नेत्याची खासदारकी तडकाफडकी रद्द करण्याचा प्रसंग हा भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक – जयंत पाटील

देशातील सर्वात मोठ्या विरोधी पक्षाच्या नेत्याची खासदारकी तडकाफडकी रद्द करण्याचा प्रसंग हा भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी माध्यमांसमोर व्यक्त केले. देशात विरोधकांना चिरडण्याची नवी पद्धत सुरु झाली आहे. हे पटवून देताना जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पी.पी. मोहम्मद फैजल यांचे उदारहण दिले.
भारतीय जनता पक्ष हा पक्ष नसून निवडणुक जिंकण्याचे यंत्र आहे, असा शेरा जयंतराव पाटील यांनी मारला. केवळ निवडणुका जिंकण्याच्या मोडमध्ये भारतीय जनता पक्ष असतो. लोकांची सेवा करणे अथवा लोकहिताचे निर्णय घेणे यापेक्षा विरोधकांना नेस्तनाबूत करण्याचे काम देशाच्या वेगवेगळ्या भागात सुरु आहे. मात्र देशातील सर्व विरोधी पक्ष यामुळे अधिक ताकदीने संघटित होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.