‘सेनेचा बाण भरकटला, घड्याळाचं टाईमिंग चुकलं आणि जनतेनं काँग्रेसची साथ सोडली’

मुंबई: राज्यातील विधान परिषदेच्या सहा जागांपैकी चार जागा बिनविरोध झाल्यानंतर नागपूर आणि अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निवडणुकीच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. दोन्हा जागांवरील निकाल लागले असून, नागपूर, अकोल्यात भाजपनं विजयाचा गुलाल उधळला आहे. तर अकोल्यात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीका केली आहे.

यासंदर्भात चित्रा वाघ यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये त्या म्हणाल्या आहेत की,’मंत्री..पालकमंत्री..मुख्यमंत्री..सर्व सरकारी यंत्रणा तिघाडीची असूनही जनतेनं भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे आणि वसंत खंडेलवाल यांच्या बाजूनं कौल दिला.’ तसेच पुढे त्या म्हणाल्या की,’या निकालाचा अर्थ…शिवसेनेचा बाण भरकटलाय, घड्याळाचं टाईमिंग चुकलंय आणि जनतेनं काँग्रेसची साथ सोडलीय.’

दरम्यान, अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात चुरशीची लढत झाली. या लढतीत भाजपचे वसंत खंडेलवाल हे विजयी झाले आहेत. वसंत खंडेलवाल यांना ३३८ तर शिवसेनेच्या गोपिकिशन बाजोरिया यांना ३२८ मतं मिळाली आहेत.तर नागपूरमध्ये भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी देण्यात आली होती.

काँग्रेसला ऐनवेळी उमदेवार बदलावा लागला होता. छोटू भोयर यांच्या जागेवर अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना काँग्रेसने पाठिंबा दिला होता. आज(१४ डिसें.) या निवडणुकीची मतमोजणी पार पडली असून नागपूर विधान परिषदेच्या जागेवर भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाजी मारली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना ३६२ मतं मिळाली. काँग्रेस समर्थित उमेदवार मंगेश देशमुख यांना १८६ मतं मिळाली. तर, छोटू भोयर यांना १ मत मिळालं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी २७८ मतांचा कोटा पूर्ण केला आहे.