वारकऱ्यांची पुणे मुक्कामी गैरसोय होणार नाही यासाठी भाजपाच्या शिष्टमंडळाने महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांची घेतली भेट
पुणे : दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे आषाढी वारीसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा ३० जून आणि १ जुलै २०२४ रोजी पुण्यात मुक्कामाला येत आहे. यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आले आहे. यापरिस्थितीत वारकऱ्यांची पुणे मुक्कामी गैरसोय होणार नाही यासाठी मंगळवारी पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांच्या पुढाकाराने भाजपाच्या शिष्टमंडळाने महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांची भेट घेतली. आयुक्तांनी पालखी मुक्कामावेळी सर्व उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन यावेळी दिले.
आषाढी वारीसाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा ३० जून आणि १ जुलै २०२४ रोजी पुण्यात मुक्कामाला येत आहे. या पालखीमध्ये असलेले लाखो वारकरी दोन दिवस पुण्यात मुक्कामाला असतात. यंदाच्या वर्षी पावसाळा वेळेत सुरू झाला असून, सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता केंद्रीय हवामान विभागाने वर्तविली आहे. या बाबींचा विचार करून महापालिकेने पालख्या आणि वारकरी पुणे मुक्कामी असताना त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी आतापासूनच नियोजन करून आवश्यक उपाय योजले पाहिजेत. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी आणि जिथे वारकरी मुक्काम करतात तिथे मंडप उभारले पाहिजेत. आवश्यक तात्पुरती स्वच्छतागृहे निर्माण केला पाहिजे. यासोबतच वारकऱ्यांच्या सोयीसाठी आवश्यक असलेले सर्व उपाय योजले पाहिजेत. जेणेकरून वारकऱ्यांची पुणे मुक्कामी गैरसोय होणार नाही. या मागण्या मंगळवारी पुणे शहर भाजपाच्या शिष्टमंडळाने महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन त्यांच्याकडे केल्या आहेत.
आयुक्त राजेंद्र भोसले यांनी यावेळी पालखी मुक्कामावेळी सर्व उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन दिले आहे. यावेळी आमदार भीमराव तापकीर, श्रीनाथ भिमाले, सरचिटणिस रवींद्र साळेगावकर, युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस सुशील मेंगडे, यांसोबत भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.