जनतेचा विश्वास गमावलेल्या, महाघोटाळेबाज सरकारचा चहा घेणं हा जनतेचा अपमान!- विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार
विधीमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडी व इतर मित्रक्षांची अधिवेशना संदर्भात महत्त्वपूर्ण आढावा बैठक मुंबई येथे पार पडली. त्यांनतर पत्रकार परिषदेत घेत सत्ताधाऱ्यांवर आरोप करत चहापान कार्यक्रमावर त्यांनी बहिष्कार टाकला. माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले कि, राज्यातील बळीराजा दुष्काळ, पाणी टंचाई, नैसर्गिक आपत्ती, वाढता कर्जाचा बोजा, पिकविमा कंपन्यांकडून होणारी फसवणूक यामुळे पिचला आहे. महायुतीच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्याबरोबरच संपूर्ण वीजबील माफी करावी, अशी मागणी आम्ही वारंवार केली. तरी देखील संवेदना गमावलेल्या सरकारने केवळ घोषणाबाजी करून शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली.
ते पुढे म्हणाले कि, या कारणांमुळेच पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या सत्ताधाऱ्यांच्या चहापान कार्यक्रमावर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला आहे. जनतेचा विश्वास गमावलेल्या महाघोटाळेबाज, महाटेंडरबाज, महाभ्रष्टाचारी सरकारचा चहा घेणं हा, लोकशाहीचा तसेच महाराष्ट्रातील जनतेचा अपमान असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी बाळासाहेब थोरात, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व मविआ आघाडीतील प्रमुख नेते यावेळी उपस्थितीत होते.