मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रचार आणि प्रसारासाठी या चित्ररथाचा नक्की उपयोग होईल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून महिलांना आर्थिकदृष्ट्या सशक्त करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यभरात लागू झाली आहे. या योजनेबाबत जनजागृती आणि महिलांना मदतीसाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या चित्ररथाचे आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जाणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यभरातून महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. याचा प्रसार अधिकाधिक करण्यासाठी राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या माध्यमातून चित्ररथ तयार करण्यात आला आहे. या योजनेच्या प्रचार आणि प्रसारासाठी या चित्ररथाचा नक्की उपयोग होईल, असा विश्वास या प्रसंगी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
या वेळी मोनिका मोहोळ, हर्षाली माथवड, दुष्यंत मोहोळ, निलेश कोंढाळकर, नवनाथ जाधव, दिनेश माथवड, बाळासाहेब दांडेकर यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि माता-भगिनीही उपस्थित होत्या.