एक गुरु हजारो लोकांना जीवनाची दिशा देत असतो – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
नाशिक : दैनिक देशदूत वृत्त समूहाच्या वतीने नाशिक येथे ” गुरु सन्मान २०२४” या पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी गुरुजनांचे समाजातील योगदान आणि महत्व विशद केले. एक गुरु हजारो लोकांना जीवनाची दिशा देत असतो असे पाटील म्हणाले.
चंद्रकांत पाटील यावेळी बोलताना म्हणाले कि, विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य, नम्रता, प्रामाणिकपणा केवळ शिक्षकच निर्माण करू शकतात. त्यामुळे गुरूंना आता निवृत्त होता येणार नाही. जगाची हुशार आणि होतकरू तरुणांची गरज भागविण्यासाठी आता जर्मनीसुद्धा भारतीय तरुणांकडे आशेने पाहत आहे. ती अपेक्षा गुरूंशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, असे पाटील यांनी म्हटले.
पाटील पुढे म्हणाले कि, आजच्या काळात आदर्श शिक्षकांना कदापि निवृत्त होता येणार नाही. कारण सारे जग भारताकडे मोठ्या आशेने पाहत आहे. जर्मनीने भारताकडे चार लाख शिक्षित तरुणांची मागणी केली आहे. त्यातील चाळीस हजाराची पहिली तुकडी नुकतीच रावना झाली आहे. त्यामुळे भविष्यात जगाची गरज भागवण्यासाठी शिक्षकांशिवाय दुसरा पर्याय नाही, असे यावेळी पाटील यांनी स्पष्ट केले.
गुरुदक्षिणा कॅम्पसच्या पलाश हॉल येथे झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते गौरव झाल्याने शिक्षकांमधील गुणांना प्रोत्साहन मिळाल्याची भावना पुरस्कार्थींमध्ये दिसून आली.
यावेळी व्यासपीठावर नीती आयोग शिक्षण उपसमिती सदस्य महेश दाबक, जी. एन. सपकाळ कॉलेज ऑफ इंजिनीयरिंगचे प्राचार्य डॉ. साहेबराव पाटील, यासोबतच देशदूत वृत्तसमूहाचे अध्यक्ष विक्रम सारडा, संपादक डॉ. वैशाली बालाजीवाले, जाहिरात व्यवस्थापक अमोल घावरे उपस्थित होते.