महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती म्हणून निवड… अत्यंत स्वच्छ आणि निष्कलंक कारकीर्द असलेले सी.पी. राधाकृष्णन उपराष्ट्रपतीपदालाही यथोचित न्याय देतील – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

78

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची देशाचे 15 वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. या निवडणुकीत एकूण 767 खासदारांनी मतदान केले, त्यापैकी 752 मते वैध ठरली. एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांना 452 मते मिळाली आहेत. तसेच त्यांचे विरोधक इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांना 300 मते मिळाली. भारताच्या उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल एनडीएचे उमेदवार आणि महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय सी. पी. राधाकृष्णन यांचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.

चंद्रकांत पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले, प्रखर राष्ट्रवादी विचारांचे भाजपा कार्यकर्ता, खासदार, राज्यपाल आणि आता देशाचे उपराष्ट्रपती असा सी.पी. राधाकृष्णन जी यांचा प्रवास प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्यासाठी प्रेरणादायी आणि स्फूर्तीदायी आहे. अत्यंत स्वच्छ आणि निष्कलंक कारकीर्द असलेले सी.पी. राधाकृष्णन जी उपराष्ट्रपतीपदालाही यथोचित न्याय देतील, याची खात्री असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले. उपराष्ट्रपती निवडणुकीत सी.पी. राधाकृष्णन यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणाऱ्या एनडीएच्या सर्व खासदारांचे देखील पाटील यांनी मनापासून आभार मानले.

उपराष्ट्रपती पदासोबत राष्ट्रपती यांच्या अनुपस्थितीत ते अस्थायी राष्ट्रपती म्हणून देखील कार्य करतील, यासोबतच राज्यसभेचे अध्यक्ष पदही भूषवतील. सीपी राधाकृष्णन यांची झारखंडनंतर महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. राज्यात विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु असताना राधाकृष्णन यांची राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. आता महाराष्ट्रातून ते थेट दिल्लीच्या उपराष्ट्रपतीपदी विराजमान झाले आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.