छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळा एक महिन्याच्या आत उभारा,आमदार भरत गोगावले यांच्या पाठपुराव्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आदेश
माणगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे, येथील प्रांगणात छत्रपती शिवाजीमहाराजांचा प्रलंबित अश्वारूढ पुतळा एक महिन्याच्या आत उभारण्यात यावा, तसेच विविध समस्यावरील आढावा बैठक शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या मंत्रालयातील दालनात नुकतीच मुंबई येथे संपन्न झाली.
यावेळी मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या समोर कॉलेज मधील विविध तक्रारी संदर्भात मुद्दे देखील उपस्थित करत करण्यात आले. आमदार गोगावले यांच्या मागणीनुसार छत्रपती शिवरायांचा प्रलंबित पुतळा पुढील एक महिन्याच्या आत उभारण्यात यावा असे आदेश यावेळी चंद्रकांत पाटील यांनी संबंधित विभागाला देत कॉलेजच्या इतर विविध मागण्यांना देखील तात्काळ मान्यता दिली असल्याची माहिती आमदार भरत गोगावले यांनी दिली. लोणेरे विद्यापीठाच्या प्रांगणात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते.
या बैठकीसाठी लोणेरे विद्यापीठाचे कुलगुरु, उपकुलसचिव, आमदार महेंद्र थोरवे तसेच संबंधित अधिकारी इत्यादी उपस्थित होते.