‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे महायुती सरकारने महिलांप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
कोल्हापूर : महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या प्रचार मेळाव्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या समवेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती होती.
चंद्रकांत पाटील म्हणाले कि, विकसित भारत घडविणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे स्वप्न आहे. महिलांचा विकास झाला, तरच भारत विकसित होऊ शकतो असे पंतप्रधान कायम म्हणतात. त्यामुळेच केंद्र आणि राज्यात स्त्रीकेंद्रित योजना सुरू केल्या आहेत. लखपती दिदी, लेक लाडकी, शिक्षण शुल्क माफी योजना आणि लाडकी बहीण योजना या दृष्टीकोनातूनच सुरू करण्यात आल्या आहेत. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे महायुती सरकारने महिलांप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता आहे. ही भावाने दिलेली ओवाळणी आहे. या योजनेमुळे माता भगिनिंच्या जीवनात आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल, असा विश्वास वाटत असल्याचे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेमुळे महिलांच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत असून त्यांचे अर्थकारण अधिक बळकट होत आहे. ही योजना बंद तर होणारच नाही उलट भविष्यात या योजनेतील मिळणाऱ्या दरमहा रकमेत वाढ करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. ते यावेळी म्हणाले, कल्याणकारी योजनांची सांगड घालून विकास कामे केली जात आहेत. लाडकी बहीण योजना सर्वसामान्य महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे. म्हणून तर लोकप्रिय अशा या योजनेत राज्यात 1 कोटी 40 लाखांहून अधिक महिलांनी सहभाग नोंदविला. यातील 1 कोटी 10 लाखांहून अधिक महिलांना दोन महिन्यांचे पैसेही वितरीत करण्यात आले. सर्वसामान्य महिला आपल्या जीवनात करीत असलेल्या काटकसरीमध्ये दैनंदिन खर्चासाठी हे हक्काचे पैसे महत्त्वाचे ठरत आहेत. यातून महिला अर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यास सुरूवात झाली आहे. आता त्यांना घरात पैसे मागण्याची गरज राहणार नाही.
या सोहळ्यास वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, उद्योगमंत्री उदय रविंद्र सामंत , महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, लोकसभा सदस्य धैर्यशील माने , राज्यसभा सदस्य खासदार धनंजय महाडिक , महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे उपाध्यक्ष प्रकाश आबिटकर , आमदार प्रकाश आवाडे , राजेंद्र पाटील-यड्रावकर, राजेश पाटील, सदाभाऊ खोत, पुणे महसूल विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त के.मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित तसेच जिल्ह्याच्या विविध भागांतून आलेल्या लाखो लाडक्या बहिणी उपस्थित होत्या.