पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच कटिबद्ध – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

सांगली : मिरज येथील भोकरे इन्स्टिट्यूटमध्ये महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई डिजीटल मिडिया राज्य अधिवेशन मोठ्या उत्साहात पार पडले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तसेच सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हे अधिवेशन संपन्न झाले. या अधिवेशनात पत्रकारितेतील बदलते आयाम, डिजीटल मिडियाची वाढती भूमिका आणि पत्रकारांच्या समोरील आव्हानांवर सखोल चर्चा करण्यात आली.
सांगली येथे आयोजित डिजिटल मीडिया राज्यस्तरीय परिषदेत उपस्थित राहून चंद्रकांत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना पाटील म्हणाले कि, पत्रकार एखाद्या बातमीसाठी दिवसरात्र मेहनत घेत असतात. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच कटिबद्ध आहे, अशी ग्वाही यावेळी पाटील यांनी दिली. त्यासोबतच पत्रकारांनी आसपासच्या परिसरात घडणाऱ्या सकारात्मक घडामोडींनाही प्रसिद्धी देऊन प्रोत्साहन द्यावे, अशी भावना व्यक्त केली.
यावेळी आ. गोपीचंद पडळकर, ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे, मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे, डिजिटल मीडिया विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांच्यासह इतर मान्यवर आणि पत्रकार बांधव उपस्थित होते.