नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातून अष्टपैलू विद्यार्थी घडतील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला विश्वास व्यक्त

20

कोल्हापूर : कोल्हापूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय येथे उभारण्यात आलेल्या नवीन संकुलाचे भूमिपूजन तसेच शासकीय तंत्रनिकेतनात उभारण्यात आलेल्या रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्स ही उत्कृष्टता केंद्रे व बहुउद्देशीय संगणक कक्षाचे उदघाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कोल्हापूरमध्ये पुढील वर्षापासून शासकीय फार्मसी महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा पाटील यांनी केली. भारतामध्ये 2020 साली नवे शैक्षणिक धोरण आले, देशात महाराष्ट्र राज्य नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत आघाडीवर आहे. एकत्रित शिक्षण पद्धतीमुळे आणि संयुक्त विद्यापीठ सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना वेगवेगळे विषय एकत्रित शिकता येणार असून आता अष्टपैलू विद्यार्थी घडतील, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले, कौशल्यपूर्ण मनुष्यबळ उपलब्धतेचे आपल्यासमोर मोठे आव्हान असून जगातील अनेक देश यासाठी भारतावर अवलंबून आहेत. कोट्यवधी महिलांना दुपारच्या चार तासात रोजगार देण्याचा आपला मानस असून त्यासाठी आवश्यक छोटी अभ्यासक्रम तंत्रनिकेतनने तयार करावीत, असे नमूद केले. या महाविद्यालयासाठी आणि अन्य इमारतींसाठी १७५ कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. तंत्रनिकेतनेदेखील विविध पूरक अभ्यासक्रमांनी सुसज्ज करण्यात येत असून प्रयोगशाळांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिक कौशल्ये मिळावीत यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही यावेळी स्पष्ट केले.

विविध देशांबरोबर भारत सरकार, महाराष्ट्र राज्य यांच्यात कौशल्य आधारीत मनुष्यबळ मिळण्यासाठी विविध करार झाले आहेत. जगाच्या पाठीवर भारतींयासाठी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्याकरीता आपल्याला विदेशातील नोकऱ्यांसाठी अर्ज करावा लागेल. या प्रक्रियेत शासन मदत करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, महिलांना रोजगार वाढावा म्हणून आता चार तासांचे काम याबाबत विचार करायला हवा. महिलांना आपले घर सांभाळून काम करता यावे यासाठी आणि त्यांना खऱ्या अर्थाने सक्षम करण्यासाठी अशा धोरणाची गरज आहे. राज्य शासनही याबाबत धोरण आणण्याचा विचार करीत आहे. पुण्यात लवकरच 100 महिलांना या पद्धतीने काम देणे सुरू करणार आहे. कौशल्यावर आधारीत मनुष्यबळ निर्मितीसाठी तसे अभ्यासक्रम निर्माण होणे आवश्यक आहे. यासाठी आपल्या आसपासच्या उद्योगांमध्ये कशाची आवश्यकता आहे याचा अभ्यास करा. यामुळे स्थानिक उद्योगांमध्ये काय गरज आहे आणि आपण कोणत्या प्रकारचे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना दिले पाहिजेत हे कळेल. कोल्हापूर जिल्हयात पुढिल शैक्षणिक वर्षापासून फार्मसी कॉलेज सुरू करणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. ते म्हणाले जिल्हयात शासकीय फार्मसी कॉलेज नाही. लोकांची मागणी पुर्ण करून फार्मसी कॉलेज याच जागेत सुरू करु किंवा जिल्हाधिकारी यासाठी नवीन जागा उपलब्ध करून देतील.

कायक्रमास खासदार धनंजय महाडिक, तंत्रशिक्षण संचालनालय मुंबईचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, अधिक्षक अभियंता तुषार बुरूड, सहसंचालक दत्तात्रय जाधव, उपसचिव मोहम्मद उस्मानी, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ.नितीन सोनजे, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य एस. के. पाटील आदी उपस्थित होते.

खासदार महाडिक यांनी पाटील यांचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीसाठी निधी उपलब्ध केल्याबद्दल आणि मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण योजना सुरु केल्याबद्दल आभार व्यक्त केले. महाडिक म्हणाले की, नव्या शैक्षणिक धोरणामुळे वाढत्या उद्योग क्षेत्राला आवश्यक मनुष्यबळ कोल्हापूर मधून मिळेल. कोल्हापूर जिल्ह्यातील उद्यमनगर ते पंचतारांकित एमआयडीसीमधील व्यावसायिकांबरोबर विद्यार्थ्यांनी संवाद साधून कौशल्यात भर टाकावी. प्रास्ताविकात संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 175 कोटींच्या नवीन इमारतीची, रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थींग्स आणि बहूउद्देशिय संगणक कक्षाची उपस्थितांना माहिती दिली.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.