केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभाग यांच्यासमवेत महाराष्ट्राच्या वतीने ऑटोमेशन आणि रोबोटिक्स क्षेत्रात एक सामंजस्य करार
नवी दिल्ली : आज नवी दिल्ली येथे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णवजी यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभाग (NIELIT) यांच्यासमवेत महाराष्ट्राच्या वतीने ऑटोमेशन आणि रोबोटिक्स क्षेत्रात एक सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्यातील उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग तसेच विद्यार्थी यांच्यासाठी हा करार लाभदायक ठरणार असल्याचे पाटील म्हणाले. या करारावर स्वाक्षरी प्रसंगी केंद्र आणि राज्य सरकारचे अधिकारी उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री माननीय अश्विनी वैष्णवजी यांनी रेल्वेबरोबरच माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात देखील खूप चांगले काम केले आहे. एका कार्यक्रमात त्यांची भेट झाली असता रेल्वे महाराष्ट्राला काय काय देत आहे, याची यादीच त्यांनी वाचून दाखवली. महाराष्ट्रात सेंटर ऑफ एक्सलन्स अंतर्गत आम्ही काय काय करीत आहोत, याची माहितीही त्यांनी जाणून घेतली. या प्रकल्पाच्या विस्तारासाठी अधिक निधी देण्याचे आश्वासन वैष्णव यांनी यावेळी दिले.
मंत्री अश्विनी वैष्णवजी यांच्या विभागाच्या कार्यक्षम सहकाऱ्यांनी पाठपुरावा केला आणि आज चांगला निधी महाराष्ट्राला उपलब्ध झाला असल्याची माहिती पाटील यांनी दिली. सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयात तंत्रज्ञान विषयक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी त्याचा उपयोग होईल. अश्विनी वैष्णवजी यांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांना, तसेच या गतिमान प्रशासनाची प्रेरणा असलेले लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्र सरकार यांना पाटील यांनी मनःपूर्वक धन्यवाद दिले.