तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएमचा घोटाळा नसतो का? , ईव्हीएमच्या मुद्द्यावरून एकनाथ शिंदेंचा शरद पवारांना सवाल
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात विरोधकांनी ईव्हीएमबाबत उलटसुलट चर्चा सुरु केली. राष्ट्रवादीचे (शरद पवार ) अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले कि, विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मते मिळूनही आम्हाला कमी जागा कशा मिळाल्या? असा प्रश्न उपस्थित केला. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. शिंदे यांनी म्हटले कि, तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएमचा घोटाळा नसतो का? असा प्रतिसवाल एकनाथ शिंदेंनी विचारला. विरोधी पक्षाला माझं आव्हान आहे, रडगाणं थांबवा, रडगाणं बंद करा आणि विकासकामे सुरू करा”, असं आव्हानही एकनाथ शिंदे यांनी यावेळी केलं.
माध्यमांना प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले, लोकसभेच्या निवडणुका झाल्या. आता प्रियांका गांधी देखील जिंकल्या. म्हणजे जेव्हा आपण हरतो तेव्हा ईव्हीएम घोटाळा म्हणायचं. जेव्हा आपण जिंकतो तेव्हा ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरची मागणी कोणी करत नाही. हा दुटप्पीपणा असल्याचे वक्तव्य शिंदे यांनी केले. विरोधी पक्षाकडे कोणताही मुद्दा राहिला नाही. मी म्हणालो होतो,विरोधी पक्षाला लाडकी बहीण चारीमुंड्या चित करेल. सर्व घटकांनी या राज्यातील विरोधी पक्षाला त्यांची जागा दाखवली. जनता घरी बसणाऱ्यांना मतदान करत नाहीत. काम करणाऱ्यांना मतदान करतात, असा टोला देखील शिंदे यांनी लगावला.
शिंदे पुढे म्हणाले कि, सर्वोच्च न्यायालयापासून निवडणूक आयोगापर्यंत विरोधी पक्षाने नेहमीच त्यांच्या बाजूचा निकाल लागला तेव्हा त्यांना चांगलं म्हटलं. त्यांच्याविरोधात निकाल लागला तेव्हा आक्षेप घेतला. सुप्रीम कोर्टावर देखील त्यांनी आरोप केले. हे लोकशाहीला घातक आहे. या महाराष्ट्रात लोकशाही मार्गाने झालेल्या निवडणुका आहेत, महायुतीचं काम जनतेने पाहिलं. अडीच वर्षांत महाविकास आघाडीने बंद पाडलेले प्रकल्प, कल्याणकारी योजना सुरू केल्या. या योजनांचा परिपाक या कामांची पोचपावती या निवडणुकीत बघायला मिळेल. तसंच झालं. लोकसभा निवडणुकीचे उदाहरण देत शिंदे म्हणाले कि, दोन लाखांचा फरक असून त्यांना जागा जास्त आल्या. त्यांचे जास्त उमेदवार जिंकून आले. आम्हाला १७ जागा आणि महाविकास आघाडीला ३१ जागा मिळाल्या. हा ईव्हीएम घोटाळा झाला म्हणायचा का? त्यावेळी त्यांनी काही आक्षेप घेतला नाही, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.
शरद पवार नेमकं काय म्हणाले ?
शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण करताना म्हटले होते की, काँग्रेस पक्षाला ८० लाख मते पडूनही त्यांचे फक्त १६ आमदार विजयी झाले. शिवसेनेला (एकनाथ शिंदे) ७९ लाख मते मिळाली आहेत आणि ५७ आमदार निवडून आले आहेत. म्हणजे एक लाख कमी मतदान मिळूनही जवळपास ४१ आमदार अधिक निवडून आले आहेत.