मुंबईच्या उच्च शिक्षणाला बळ; हैद्राबाद कॉलेजिएट समूह विद्यापीठामध्ये आणखी ५ महाविद्यालयांचा समावेश

9

मुंबई : मुंबईतील हैद्राबाद(सिंध) नॅशनल कॉलेजिएट समूह विद्यापीठामध्ये आणखी पाच महाविद्यालयांचा घटक म्हणून समावेश करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या दूरदर्शी निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मनःपूर्वक आभार मानले.

हैद्राबाद(सिंध) नॅशनल कॉलेजिएट समूह विद्यापीठामध्ये प्रमुख महाविद्यालय म्हणून हसाराम रिजूमल वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय आणि घटक महाविद्यालये म्हणून किशनचंद चेलाराम, चर्चगेट, आणि बॉम्बे अध्यापक प्रशिक्षण महाविद्यालय, कुलाबा यांचा समावेश आहे.

आता या समूह विद्यापीठात प्राचार्य के. एम. कुंदनानी औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालय, कफ परेड, किशनचंद चेलाराम विधि महाविद्यालय, चर्चगेट आणि श्रीमती मिठीबाई मोतीराम कुंदनानी वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालय,वांद्रे-पश्चिम, ऋषी दयाराम आणि सेठ हसराम नॅशनल आणि सेठ वासियामुल्लु असोमुल्लु विज्ञान महाविद्यालय, वांद्रे-पश्चिम आणि थ़डोमल शाहनी अभियांत्रिकी महाविद्यालय अशा पाच महाविद्यालयांचा समावेश होणार आहे.

या निर्णयामुळे मुंबईतील उच्च शिक्षणाचा दर्जा अधिक उंचावण्यास आणि विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. या पाच नव्या महाविद्यालयांच्या समावेशामुळे ‘एचएसएनसी’ समूह विद्यापीठाची व्याप्ती आणि ताकद अधिक वाढणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला (NEP) अनुसरून विविध विषयांचे शिक्षण एकाच छताखाली मिळेल. उद्योगाभिमुख आणि आधुनिक रोजगाराच्या संधी देणारे अभ्यासक्रम उपलब्ध होतील. सर्व पाचही महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या अद्ययावत प्रयोगशाळा आणि संसाधनांचा लाभ घेता येईल.

Get real time updates directly on you device, subscribe now.