स्वर्गीय लोकनेते लक्ष्मण जगताप हे फक्त नाव नसून समाजासाठी प्रेरणादायी अध्याय आहे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पिंपरी चिंचवड : लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त पिंपरी- चिंचवडमध्ये त्यांचे स्मारक उभारण्यात येत आहे. त्याचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून भाऊंच्या स्मृतीस अभिवादन केले.
यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना चंद्रकांत पाटील म्हणाले, स्वर्गीय लोकनेते लक्ष्मण जगताप हे फक्त नाव नसून समाजासाठी प्रेरणादायी अध्याय आहेत. त्यांनी निष्ठा, सामर्थ्य, आणि सेवाभावाने समाजाच्या विकासासाठी आयुष्य वेचले होते, असे गौरवोद्गार पाटील यांनी काढले.
यावेळी केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, माजी मंत्री आमदार डॉ. तानाजी सावंत, मावळ लोकसभा खासदार श्रीरंग बारणे, पुणे महापालिका शिक्षण मंडळाचे माजी उपाध्यक्ष विजयआप्पा रेणुसे, भोसरी विधानसभा आमदार महेश लांडगे, पिंपरी विधानसभा आमदार अण्णा बनसोडे, भोर विधानसभा आमदार शंकर मांडेकर, मावळ विधानसभा आमदार सुनील शेळके, विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे तसेच कार्यक्रमाचे निमंत्रक माजी आमदार अश्विनी जगताप, आमदार शंकर जगताप, गोसेवक विजूशेठ जगताप, माजी महापौर माई ढोरे, भाजपा कार्यकारी शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे, राष्ट्रवादी पक्षाचे नेते विठ्ठल ऊर्फ नाना काटे तसेच अनेक मान्यवर पदाधिकारी, जगताप परिवाराचे नातेवाईक, कार्यकर्ते, लक्ष्मणभाऊंबरोबर काम केलेले सर्व जुने सहकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रकल्पाला शुभेच्छा देत सांगितले की, शक्तिस्थळ हा प्रकल्प समाजाच्या उन्नतीसाठी एक प्रेरणादायी संदेश ठरेल. हा प्रकल्प पिंपरी-चिंचवड शहराला एक नवीन ओळख मिळवून देईल. पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाची दूरदृष्टी ठेवत लोकनेते लक्ष्मण जगताप यांच्या स्मृतींना अर्पण करण्यात येणाऱ्या ‘शक्तिस्थळ’ प्रकल्पाद्वारे निष्ठा, सामर्थ्य, सेवाभाव आणि दातृत्वाचे प्रतीक असलेल्या लक्ष्मणभाऊंच्या स्मृती जपण्याबरोबरच भावी पिढ्यांना प्रेरणा देणे हा उद्देश आहे.