“सुखदा” या उपक्रमामुळे वस्ती भागातील माता भगिनींना उत्तम आरोग्य मिळेल, असा विश्वास – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : मातृत्व म्हणजे स्त्रीचा दुसरा जन्मच असतो. गरोदरपण ते बाळंतपण या काळात स्त्रीच्या शरीर, मन आणि स्वभावात अनेक बदल घडत जातात. गर्भधारणा झाल्यापासून बाळाच्या संगोपनापर्यंत शारीरिक बदल आणि त्रास, अडचणी स्त्रीला सहन कराव्या लागतात. वस्ती भागातील महिलांना आर्थिक अडचणींमुळे अशा परिस्थितीत येणाऱ्या बदलांना सामोरे जाणे आणखी कठीण जाते. या महिलांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम रहावे आणि बाळ निरोगी जन्माला यावे; या उद्देशाने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी “सुखदा” हा उपक्रम कार्यन्वित केला आहे. सोमवारी या उपक्रमाचा शुभारंभ चंद्रकांत पाटील यांच्या पत्नी अंजली यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमामुळे वस्ती भागातील माझ्या माता भगिनींना उत्तम आरोग्य मिळेल, असा विश्वास याप्रसंगी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
या उपक्रमाबाबत माहिती देताना पाटील यांनी सांगितले कि, गर्भवती महिलांसाठी ‘सुखदा’ हा अभिनव उपक्रम कार्यान्वित करण्यात आला आहे. गर्भधारणा झाल्यापासून बाळाच्या संगोपनापर्यंत आवश्यक सेवा या उपक्रमांतर्गत स्त्रियांना पुरवण्यात येतील. गरोदरपण हा अतिशय संवेदनशील विषय आहे. इथे येणारी महिला हि समाधानी व्हावी, इथे येणाऱ्या महिलेची प्रसूती सुखरूप व्हावी, प्रसूतीनंतर महिलेच्या तब्येतीची संपूर्ण काळजी घेतली जावी या सर्व उद्देशाने हा उपक्रम सुरु करण्यात आला असल्याचे पाटील यांनी म्हटले. महिलांनी ह्या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, ही विनंती पाटील यांनी केली.