ज्येष्ठ लेखिका डॉ. मीनाताई प्रभू यांच्या निधनाने मराठी साहित्य विश्वाची मोठी हानी – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : ज्येष्ठ लेखिका डॉ. मीनाताई प्रभू यांचे शनिवारी दुपारी पुणे येथील त्यांच्या निवासस्थानी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य विश्वाची मोठी हानी झाली असल्याची भावना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. डॉ. मीनाताई प्रभू यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
चंद्रकांत पाटील यांनी प्रभू यांना श्रद्धांजली अर्पण करताना म्हटले कि, प्रवासवर्णनाची अनोखी शैली त्यांनी मराठी साहित्य विश्वाला दिली. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य विश्वाची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना, असे पाटील यांनी म्हटले.
डॉ. मीना प्रभू यांचा जन्म २७ ऑगस्ट १९३९ रोजी पुण्यात झाला. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस पदवी संपादन केल्यानंतर पुढील शिक्षण त्यांनी मुंबईत घेतले. विविध देशांमधील संस्कृती, समाजव्यवस्था, राहणीमान, तेथील नागरिकांची स्वभाववैशिष्ट्ये आणि त्या देशाचे ऐतिहासिक कंगोरे सहज सोप्या आणि ओघवत्या शैलीत लिखाण करणे हि त्यांची खासियत. ‘माझं लंडन’ हे त्यांचे पहिले पुस्तक. पुढे इजिप्तायन, तुर्कनामा, ग्रीकांजली, चिनी माती, गाथा इराणी, ही त्यांनी लिहिलेली पुस्तके.