पंढरपूरमध्ये धक्कादायक घटना… लिंगायत समाजाच्या धर्मगुरूला मठातच अमानुष मारहाण

270

पंढरपूर: पंढरपूरमध्ये मठाच्या वादावरून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ‘या मठाचा मीच पुजारी आणि मालक असून तू बाहेरुन आलेला आहे, तुझा येथे काहीही एक संबंध नाही ‘असं म्हणत सिध्दनकेरी येथील मठाच्या वादावरुन धर्मोपदेशकाला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. येथील गावातील गुंडांनी लाथाबुक्या आणि लोखंडी रॉडने त्यांना मठातच मारहाण केली आहे. या प्रकरणी आतापर्यंत 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मठात राहणारे राचोटेश्वर शिवाचार्य स्वामीजी यांचे वय 64 रा.सिध्दनकेरी, यांना मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी राजू लिंगाप्पा कोरे,मंजूनाथ सकलेश कोरे, भिमू सिध्दाप्पा कोरे, प्रमोद रेवाप्पा कोरे,संतोष रामचंद्र कोरे, सिध्दू येसाप्पा कोरे या सहा जणाविरुध्द मंगळवेढा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राचोटेश्वर स्वामीजी हे सिध्देनकेरी येथील तोफकट्टी संस्थान मठात गेली 36 वर्षापासून राहत आहे. या मठातच सिद्धेश्वर मंदिर ही आहे. राचोटेश्वर स्वामी हे तोफकट्टी संस्थानमध्ये मठपती म्हणून धर्मोपदेशनाचे काम करीत आहेत. त्यांच्या सोबत सेवेत त्यांची शिष्य काशिबाई रेवणसिद्धा स्वामी आणि शिवमुर्ती राचप्पा स्वामी हे नेहमी असतात.

3 मार्च रोजी रात्री 9 वाजता मठामध्ये खोलीत राचोटेश्वर स्वामीजी झोपण्याकरिता जात असताना आरोपींनी मठामधील सीसीटीव्हीची तोडफोड केली. त्यांनी ‘मठाचा मीच पुजारी आणि मालक आहे तू बाहेरुन आलेला असून तुझा इथं काहीही संबंध नाही. तू बाहेर ये’ असे म्हणून खोलीतून बाहेर ओढत आणून त्यांना बेदम मारहाण केली. त्यावेळी राचोटेश्वर स्वामीजी यांनी मारहाण करणारे आरोपी राजू लिंगाप्पा कोरे, मंजूनाथ सकलेश कोरे आणि त्यांच्या साथीदारांना ‘आपलं प्रकरण कोर्टामध्ये चालू आहे तुम्ही असे करु नका’ असे समजावण्याचा प्रयत्न केला . परंतु त्यांनी न ऐकता मठातील लाईट बंद करुन स्वामीजींना लोखंडी गजाने मारहाण करून गंभीर जखमी केलं. या प्रकरणी राचोटेश्वर स्वामी यांनी पोलीस स्टेशनमध्ये आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी ६ जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.