पुणे स्टार्टअप एक्स्पो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या “मेक इन इंडिया” उपक्रमातील स्टार्ट अप इंडियाचाच एक भाग – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करीत असताना उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने आज कोथरूड येथील एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या प्रांगणात ‘पुणे स्टार्टअप एक्स्पो २०२५’चे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे माहिती-तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांच्या हस्ते या एक्स्पोचे उदघाटन करण्यात आले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या एक्स्पोला भेट देऊन सादर करण्यात आलेल्या स्टार्ट अपची माहिती घेतली. “हा एक्स्पो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या “मेक इन इंडिया” उपक्रमातील स्टार्ट अप इंडियाचाच एक भाग आहे. या उपक्रमामुळे राज्याच्या अतिशय दुर्गम भागातील नवोदितांच्या स्टार्ट अप्सना एक व्यासपीठ मिळते आहे, याचा आनंद आहे. महिलांनाही कुटुंबाला हातभार लावण्याचा आनंद मिळेल, अशा पद्धतीचा स्टार्ट अप सुरु करावा”, अशी भावना यावेळी पाटील यांनी व्यक्त केली.
यावेळी एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे व्यवस्थापकीय अध्यक्ष डॉ. राहुल कराड, कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस, अधिष्ठाता प्रा. डॉ. सिद्धार्थ चक्रवर्ती, एक्स्पोच्या आयोजक अमृता देवगांवकर व मंदार देवगांवकर, डेटा टेकचे संचालक अमित आंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात झाली. याप्रसंगी सर्वोत्तम २४ स्टार्टअप्सना ॲड. आशिष शेलार तसेच डॉ. राहुल कराड यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. प्रदर्शनातील सहभागींना गुंतवणूकदारांशी स्टार्टअपसंबंधी थेट चर्चा व सादरीकरणाची संधीही मिळाली.
चंद्रकांत पाटील यांनी स्टार्टअपची संकल्पना कोविड संकटकाळात खऱ्या अर्थाने पुढे आली, याचा उल्लेख केला. त्याचप्रमाणे कार्पोरेट क्षेत्र आणि वर्क फ्रॉम होम, यांच्यामधील दुवा म्हणून डेस्टिनेशन को वर्किंग काम करत असल्याचे सांगितले. डेस्टिनेशन को वर्किंगमध्ये कार्यरत सुमारे दीडशे व्यावसायिकांच्या वैचारिक आदानप्रदानातूनच स्टार्टअप एक्स्पोची संकल्पना पुढे आली आणि आज ती प्रत्यक्षात आली, असेही त्यांनी सांगितले.
पाटील पुढे म्हणाले, सामान्य नागरिक आज आपल्या नोकरीपलीकडे फारसा विचार करताना दिसत नसल्याने २०१४ साली पंतप्रधान झाल्यानंतर देशाला श्रीमंत बनवायचे असेल तर देशातील नागरिक श्रीमंत व्हायला हवेत हे नरेंद्र मोदी यांच्या लक्षात आले. हे ध्येय साकारताना इनोव्हेशन्स अर्थात नवकल्पना यामध्ये महत्त्वपूर्ण वाटा उचलू शकत असल्याने त्यांना अनुरुप असे नवे शैक्षणिक धोरण, उद्योग क्षेत्राशी संलग्न प्रात्यक्षिक शिक्षण पद्धती त्यांनी आणली. यामध्ये मातृभाषेतील शिक्षणाचा प्राधान्यक्रमही वाढविला. या सर्वांमुळे आज २०२५ साली स्टार्ट अप आणि संशोधक या दोघांनाही चालना मिळत आहे. जागतिक पातळीवर विचार केला तर मागील काही वर्षात भारतातील महिला स्टार्ट अप्स हे जगात पहिल्या क्रमांकावर असून पुरुषांनी बनविलेले स्टार्ट अप्स हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यातून रोजगारनिर्मितीला प्रोत्साहन, बचतीचे महत्त्व आणि उद्योजकीय मानसिकता घडवण्याचे कार्य होत आहे.
आधुनिक काळात अनेक क्षेत्रांतील आव्हानांना नवकल्पना हेच उत्तर आहे. मात्र, त्यासाठी नवकल्पनांसाठी सातत्याने व्यासपीठे उपलब्ध झाली पाहिजेत. या व्यासपीठांचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे. ज्यामुळे समाजाच्या तळागाळापासूनच्या नवकल्पना पुढे येऊ शकतील. पुणे स्टार्टअप एक्स्पो २०२५ हा उपक्रम अशा सर्वसमावेशक नवकल्पनांना पुढे नेणारा असल्याने तो महत्त्वाचा आणि औचित्याचा आहे, असे प्रतिपादन मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.