क्रांतीवीर चापेकर स्मारकाचे लोकार्पण व राष्ट्रीय संग्रहालयाच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आणि क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या क्रांतीवीर चापेकर स्मारकाचे लोकार्पण व राष्ट्रीय संग्रहालयाच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील उपस्थिती होती. यावेळी त्यांनी चिंचवड गावातील क्रांतीवीर चापेकर स्मारकास भेट देऊन पाहणी केली.
कार्यक्रमाला पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, महेश लांडगे, शंकर जगताप, प्रशांत बंब, माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, अमर साबळे, क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे आदी मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्याबाबत पाटील यांनी म्हटले, देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात पुण्याच्या चापेकर बंधुंचे बलिदान अत्यंत मोलाचे मोलाचे आहे. चापेकर बंधू यांचे कार्य तरुण पिढीला कळावे यासाठी, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि चापेकर स्मारक समितीच्या वतीने चिंचवड गावातील चापेकर वाड्याचे पुनरुज्जीवन करण्यात आले असून, आज या वास्तूचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्यास उपस्थित राहून स्मारकाच्या भव्यतेची आणि येथील दिव्यत्वाची अनुभूती घेतली. तसेच सर्व स्मारक उभारणीत योगदान देणाऱ्या कारागिरांचे पाटील यांनी मनापासून अभिनंदन केले.
हुतात्मांच्या कार्यातून देशभक्तीची प्रेरणा मिळत असते. चापेकर बंधुचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान अमूल्य आहे. त्यांचे कार्य चापेकर स्मारकाच्या माध्यमातून नागरिकांसमोर येणार असून हे केंद्र खऱ्या अर्थाने युवकांना देशभक्तीचे संस्कार देणारे ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. हे स्मारक उभारताना तंत्रज्ञानाचा अतिशय उत्तमरित्या वापर करण्यात आला असून ते केवळ पिंपरी चिंचवडसाठी मर्य़ादित न राहता महाराष्ट्राच्या वैभवात भर घालणारे ठरेल. हे स्मारक लवकरच राष्ट्रीय स्मारक होणार आहे. यात भारताचा सुवर्णमय इतिहास पाहण्यास मिळेलअसेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.