विद्यापीठे, महाविद्यालयांनी इंधन बचतीबाबत जनजागृती उपक्रम राबवावे – मंत्री चंद्रकांत पाटील

7

मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रहिताच्या दृष्टीने केलेल्या आवाहनानुसार देशाची आर्थिक स्थिती अधिक बळकट करण्यासाठी आणि विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सार्वजनिक वाहनांचा वापर, इंधन बचत, स्वदेशीचा आग्रह, परदेशी दौरे आणि जीवनशैलीत बदल याबाबत उच्च शिक्षण संचालनालय यांनी विद्यापीठ, महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांना सूचना दिल्या आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

पाटील म्हणाले, यासंदर्भात सर्व विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण आणि राज्य सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलसचिवांना कळविण्यात आले आहे. शक्य असेल तेथे खासगी वाहनांचा वापर टाळून मेट्रो रेल्वे आणि इतर सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर करावा. यामुळे इंधनाची बचत होईल आणि पर्यावरणाचे रक्षण होईल. पेट्रोल आणि डिझेलचा मर्यादित वापर करणे, ऊर्जेची बचत वाढविणे आणि यासाठी सर्व शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे सूचित करण्यात आले आहे. कार पूलिंग सारख्या संकल्पनांनाही प्रोत्साहन द्यावे, असे सांगण्यात आले आहे.

संस्थांनी तत्काळ किंवा अपरिहार्य असल्यासच परदेश दौरे करावेत. तसेच महत्त्वाच्या किंवा अतिमहत्त्वाच्या बैठकांव्यतिरिक्त इतर बैठका प्रत्यक्ष उपस्थित राहून घेण्याऐवजी ऑनलाइन माध्यमातून आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

भारताची आयात आणि वित्तीय तूट कमी करण्यासाठी तसेच आत्मनिर्भर भारताला पाठबळ देण्यासाठी जास्तीत जास्त स्वदेशी वस्तूंचा वापर करावा, असेही संचालनालयाने नमूद केले आहे. जीवनशैलीतील बदलांच्या अनुषंगाने स्थानिक पर्यटनाला चालना देणे यांसारख्या उपक्रमांचा अवलंब करावा, असेही सूचित करण्यात आले आहे.

राज्यातील सर्व विद्यापीठे, महाविद्यालये आणि उच्च शैक्षणिक संस्थांनी या आवाहनाची गांभीर्याने दखल घ्यावी. शैक्षणिक संकुलांमध्ये या विषयावर चर्चासत्रे, शैक्षणिक आणि जनजागृती मोहिमा राबवून विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या माहितीचे सहकार्य करून घ्यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

सर्व संबंधितांनी आपल्या अधिनस्त असलेल्या महाविद्यालयांना आणि शैक्षणिक संस्थांना या संदर्भात तत्काळ सूचना निर्गमित कराव्यात आणि केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल या कार्यालयास सादर करावा, असे उच्च शिक्षण संचालनालयाने कळविले आहे, असेही पाटील यांनी सांगितले.

Get real time updates directly on you device, subscribe now.