केंद्र सरकारची कडक भूमिका… पाकिस्ताननिर्मित वेब सिरीज, गाणी, चित्रपट तात्काळ बंद करण्याचे निर्देश

109

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सर्व ओटीटी प्लॅटफॉर्म्स, मीडिया स्ट्रीमिंग सेवा व डिजिटल इंटरमिजिअरीज (मध्यस्थ) यांना पाकिस्तानमधील वेब सिरीज, चित्रपट, गाणी, पॉडकास्ट आणि इतर स्ट्रीमिंग मीडिया सामग्री तात्काळ बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. ही कार्यवाही राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे व डिजिटल मीडिया आचारसंहिता) नियम, २०२१ (IT Rules, 2021) च्या तिसऱ्या भागात ओटीटी प्लॅटफॉर्म्ससाठी आचारसंहिता निर्धारित करण्यात आली आहे. या नियमांनुसार कोणतीही सामग्री प्रसारित करण्याआधी तिच्या परिणामांचा विचार करणे आवश्यक आहे, विशेषत भारताच्या संप्रभुता आणि एकात्मतेला धक्का लावणारी सामग्री, राज्याच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारी सामग्री, भारताचे परदेशांशी मैत्रीपूर्ण संबंध बिघडवणारी सामग्री आणि हिंसा भडकवणारी किंवा सार्वजनिक शांतता भंग करणारी सामग्री. तसेच, नियम ३(१)(ब) नुसार, कोणतीही सामग्री जी भारताच्या एकता, संरक्षण, संप्रभुता किंवा परराष्ट्र संबंधांवर परिणाम करते, ती प्लॅटफॉर्मवर ठेऊ नये, यासाठी मध्यस्थांनी स्वतः प्रयत्न करणे आवश्यक आहे.

२२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम (जम्मू-काश्मीर) येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यात अनेक भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला, तर काही जण जखमी झाले. या हल्ल्याचे पाकिस्तानस्थित राज्य आणि गैर-राज्य घटकांशी संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर, भारतात कार्यरत असलेल्या सर्व ओटीटी व मीडिया स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सना सूचना देण्यात आल्या आहेत की, पाकिस्तानातून उद्भवलेली कोणतीही सामग्री ; ती मोफत असो किंवा विकत घेतलेल्या असल्यास ती तात्काळ बंद करावी.

Get real time updates directly on you device, subscribe now.