खेलो इंडिया स्पर्धेतील पदक विजेत्या पिंपरी चिंचवडकर लेकींचा आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते सन्मान

पिंपरी चिंचवड : बिहार येथे झालेल्या खेलो इंडिया यूथ गेम्स, २०२५ मध्ये पदक मिळवलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील विजेत्या लेकींचा आमदार शंकर जगताप यांनी सन्मान करत अभिनंदन केलं आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आपल्या शहरातील लेकीचं राष्ट्रीय पातळीवरील यश निश्चितच समाधान देणारे आहे. या यशामुळे आपल्या पिंपरी चिंचवड शहराचा नावलौकिक निश्चितच राष्ट्रीय पातळीवर क्रीडा क्षेत्रात आणखी ठळक झाला असल्याचे मत यावेळी जगताप यांनी व्यक्त केले.
धनुर्विद्याप्रकारात शर्वरी शेंडे (आंतरराष्ट्रीय खेळाडू) हिने २ सुवर्ण, प्रीतीका प्रदीप (आंतरराष्ट्रीय खेळाडू) हिने १ सुवर्ण, वैदेही जाधव हिने रौप्य पदक पटकावले. तसेच आर्या अतुल प्रसाद हिचा देखील सहभाग या स्पर्धेमध्ये होता. यानिमित या सर्वांचा शंकर जगताप यांनी सन्मान करत अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
शंकर जगताप यावेळी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली ‘खेलो इंडिया’ ही क्रीडाविषयक चळवळ देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. उदयोन्मुख खेळाडूंना संधी देण्यासाठी ‘खेलो इंडिया’ हे व्यासपीठ मैलाचा दगड ठरले. या स्पर्धेमुळे देशवासीयांमध्ये विविध क्रीडा प्रकारांबाबत वाढलेली उत्सुकता आणि आकर्षण निश्चितच महत्त्वाचं ठरलं. याचा सकारात्मक परिणाम म्हणून ऑलम्पिकसारख्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये विविध खेळ प्रकारात देशातील खेळाडू चमकदार कामगिरी करु लागले आहेत. याचे श्रेय निश्चितच ‘खेलो इंडिया’ या व्यासपीठाला आणि मोदी सरकारच्या माध्यमातून देशभरात क्रीडा क्षेत्रासाठी उपलब्ध झालेल्या पायाभूत सुविधांना जाते, असे जगताप यांनी म्हटले.