स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार प्रत्येक भारतीयाने आत्मसात केले पाहिजेत – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे प्रखर देशभक्तीचा जाज्वल्य विचार… ज्यातून “राष्ट्र प्रथम”चा विचार प्रत्येकाच्या मनावर कोरला जातो. या विचारांचे वैभव प्रत्येकालाच मिळावे यासाठी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून, बाणेर मधील ब्राह्मण सांस्कृतिक संघ आणि लहू बालवडकर वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून “राष्ट्र प्रथम” या विषयावर अविनाश धर्माधिकारी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून स्वातंत्र्यवीरांना अभिवादन केले. तसेच, स्वातंत्र्यवीरांचे विचार प्रत्येक भारतीयाने आत्मसात केले पाहिजेत, अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.
२५ मे २०२५ रोजी, रविवारी सायंकाळी ६ वाजता बाणेर येथील बंटारा भवन येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४२ व्या जयंतीनिमित्त ‘हर घर सावरकर’ समिती, महाराष्ट्र राज्य, कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील, लहू बालवडकर सोशल वेलफेअर आणि ब्राह्मण सांस्कृतिक संघ, बाणेर यांच्या संयुक्त विद्यमाने आताच्या चालु घडामोडींवर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
श्री. अविनाश धर्माधिकारी यांच्या सखोल मार्गदर्शनातून वक्फ कायदे, पहलगाम हल्ला, आणि समान नागरी संहिता यासारख्या ज्वलंत विषयांवर विचारप्रवर्तक मंथन घडलं. स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त आयोजित प्रेरणादायी व्याख्यानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.