पावसाळी अधिवेशनाचे कामकाज १८ जुलैपर्यत सुरु ठेवणार

मुंबई : विधानभवन येथे विधानसभा आणि विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदेजी, विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुलजी नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी सध्या सुरू असलेले विधिमंडळ पावसाळी अधिवेशन शुक्रवार, दिनांक १८ जुलै २०२५ पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. निवृत्त होणाऱ्या सदस्यांचा निरोप समारंभ बुधवार, १६ जुलै २०२५ रोजी आयोजित करण्यासंदर्भात देखील निर्णय घेण्यात आला.
बैठकीत पावसाळी अधिवेशनातील कामकाजाची रूपरेषा, चर्चा आणि शासकीय विधेयकांच्या मांडणीसंदर्भातील नियोजनावर चर्चा झाली. विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी कामकाजासंदर्भात सविस्तर माहिती दिली.
बैठकीनंतर आमदार ॲड.निरंजन डावखरे यांच्या ‘निरंतर ध्यास’ या विशेष अहवालाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा ऐतिहासिक पराक्रम
ठाणे परिवहन सेवेतील पोलीस अधिकारी श्रीमती द्वारिका भागीरथी विश्वनाथ डोखे यांनी ५४ दिवसांत माऊंट एव्हरेस्ट सर करत महाराष्ट्र पोलिस दलात इतिहास रचला आहे. ३० मार्च २०२४ रोजी त्यांनी मोहिमेला सुरुवात केली आणि २२ मे रोजी जगाच्या सर्वोच्च शिखरावर भारताचा तिरंगा फडकवला. श्रीमती डोखे या महाराष्ट्र पोलीस दलातील माऊंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. विशेष म्हणजे, माउंट एव्हरेस्टवर भारताचे राष्ट्रगीत ‘जन गण मन’ सादर करणाऱ्या त्या देशातील पहिल्या महिला गिर्यारोहक ठरल्या आहेत. यासोबतच त्यांनी जगातील चौथ्या क्रमांकाच्या उंच शिखर असलेल्या ‘माऊंट ल्होत्से’ (८५१६ मीटर) देखील यशस्वी सर केला आहे.
आई-वडीलांच्या स्मृतीस वेगळ्या प्रकारे श्रद्धांजली वाहण्याच्या उद्देशाने त्यांनी ही धाडसी मोहीम स्वीकारली होती. त्यांच्या या यशामुळे महाराष्ट्र पोलीस दलाच्या शौर्य, धैर्य आणि नारीशक्तीचे प्रतीक म्हणून त्यांचं कौतुक मान्यवरांनी केले..
इंग्लिश खाडी पार करणाऱ्या ठाण्यातील जलतरणपटूंचा ऐतिहासिक पराक्रम
ठाणे जिल्हा अॅमॅच्युअर अॅक्वाटिक असोसिएशनच्या तीन जलतरणपटूंनी अलीकडेच इंग्लंड ते फ्रान्स दरम्यानची ४६ कि.मी. अंतराची इंग्लिश खाडी यशस्वीरित्या पार केली. मानव राजेश मोरे याने १३ तास ३७ मिनिटांत, आयुष प्रवीण तावडे आणि आयुषी कैलाश आखाडे यांनी ११ तास १९ मिनिटांत ही मोहीम यशस्वी केली.
विशेष उल्लेखनीय म्हणजे, रेयांश दीपक खमकर या अवघ्या सहा वर्षांच्या बालकाने तब्बल १५ कि.मी. अंतर पोहत पार करत देशात विक्रम केला. त्याची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ मध्ये झाली असून त्याचाही यथोचित मान्यवरांनी गौरव केला.
या सर्व यशस्वी व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, तसेच सदस्य भास्कर जाधव, नितीन राऊत, जितेंद्र आव्हाड, अमीन पटेल, भाई जगताप, प्रविण दरेकर, प्रसाद लाड व संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.