राहुलजी गांधी विरोधात असभ्य भाषा वापरून मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिले की “कुंपणच शेत खात आहे” – आमदार विजय वडेट्टीवार
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी मतचोरीची पोलखोल केली तेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना इतका राग यायचा कारण काय होते की त्यांनी असभ्य भाषेचा वापर करत टीका केली. याचा एकच अर्थ जनतेला समजतो तो म्हणजे ही “मतचोरी” संगनमताने केली गेली का ? लोकशाही आणि संविधानाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न आयोग आणि भाजपने मिळून केला का ?, असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला .
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन भारतीय निवडणूक आयोगावर टीका करण्यास सुरुवात केली. महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक तसेच इतर राज्यांच्या निवडणुकीत मोठा घोळ झाला आहे. मतदारांची संख्या वाढवण्यात आली. मतदान संपल्यानंतर अचानक मतदार वाढले, एका मतदाराचे नाव दोन ते तीन राज्यांत आहे, असे गंभीर आरोप राहुल गांंधी यांनी केले. राहुल गांधींच्या या आरोपांवर प्रत्युत्तर देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींची हार्डडिस्क करप्ट झाली आहे, अशी मिश्किल टिपणी केली. यावरून काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांवर आणि भाजपवर पलटवार केला.
वडेट्टीवार म्हणाले, राहुलजी गांधी हे निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमेतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे, निवडणूक आयोगाचा बचाव करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते इतके धावपळ का करत आहे ? निवडणूक आयोग स्वतःचा बचाव करू शकत नाही का ? राहुलजी गांधी विरोधात असभ्य भाषा वापरून मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिले की “कुंपणच शेत खात आहे” राहुलजी गांधी यांनी निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले आहेत, त्याचं स्पष्टीकरण आयोगाने जनतेला दिलं पाहिजे. निवडणूक आयोगाला भाजपच्या क्लिनचीटची गरज इतकी भासते का ? हा राज्यासह देशातील जनतेला पडलेला प्रश्न आहे, असे वडेट्टीवार यांनी म्हटले.
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणले ?
खरं सांगायचं तर मतांची चोरी ही महाराष्ट्रात तसेच भारतात कुठेही झालेली नाही. राहुल गांधी यांच्या डोक्यातील चीप चोरीला गेली आहे. त्यांची हार्डडिस्क करप्ट झाली आहे. म्हणून ते त्याच-त्याच गोष्टी रोज बोलत आहेत. ते खोटं बोलून पळून जात आहेत. राहुल गांधी हे रोज वेगवेगळे आकडे देत आहेत. महाराष्ट्रात 75 लाख मतदार वाढले, असा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर आता ते महाराष्ट्रात 1 कोटी मतदार वाढले आहेत, असा दावा करतायत. दरवेळी काहीतरी नवे सांगून ते लक्ष खेचण्याचा प्रयत्न करतात. त्यांची जमीन संपलेली आहे, हे त्यांच्या लक्षात आलं आहे.