उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून कोथरुडकरांसाठी घर ते मेट्रो स्थानक विशेष बससेवा सुरु

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने आज त्यांच्या मतदारसंघात कोथरुडकरांसाठी घर ते मेट्रो स्थानक अशी विशेष आणि मोफत शटल बससेवा सुरु करण्यात आली. मेट्रो प्रवाशांसाठी लास्ट माईल कनेक्टिव्हिटी निर्माण करण्याच्या उद्देशाने चंद्रकांत पाटील आणि मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्या उपस्थितीत या सेवेचे लोकार्पण करण्यात आले.
पहिली शटल बस सेवा राजाराम पूल – माळवे चौक – वनदेवी – कर्वेनगर – डहाणूकर – कर्वे पुतळा – करिश्मा चौक – एसएनडीटी मार्गावर दररोज सकाळी ८.३० ते १ आणि सायंकाळी ४ ते ८ या वेळेत उपलब्ध राहणार आहे. नागरिकांनी या सेवेचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन यावेळी पाटील यांनी केले. मेट्रो प्रवाशांची संख्या वाढविण्यासाठी आणि शेवटच्या टप्प्याची जोडणी मजबूत करण्यासाठी रिक्षा सेवा सुरू करण्याचा प्रयत्न असल्याची घोषणा देखील त्यांनी यावेळी केली.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना आधुनिक, सुरक्षित आणि आरामदायी सार्वजनिक वाहतूक सेवा पुरवण्याच्या उद्देशाने 2022 पासून पुणे मेट्रोची सेवा शहरात कार्यरत आहे. तरीही वाढत्या लोकसंख्येमुळे आणि मेट्रो स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने, अनेकजण मेट्रोचा वापर करण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे वारंवार समोर आले आहे. त्यामुळे कोथरुडकरांनी मेट्रोचा मोठ्या प्रमाणात वापर करावा, यासाठी कोथरुड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून मोफत शटल बससेवा सुरु करण्यात येत आहे.
या सेवेमुळे सर्वसामान्य कोथरुडकरांना अधुनिक, सुरक्षित आणि आरामदायी सार्वजानिक वाहतूक सेवा पुरवण्याच्या पुणे मेट्रोच्या उद्देशास हातभार लागेल, असा विश्वास मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमास भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, विठ्ठलआण्णा बराटे, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य डॉ. संदीप बुटाला, भाजप कोथरुड दक्षिण मंडल अध्यक्ष कुलदीप सावळेकर, मतदारसंघ समन्वयक नवनाथ जाधव, माजी नगरसेवक दीपक पोटे, माजी नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, मंजुश्री खर्डेकर, वृशाली चौधरी, माजी नगरसेवक जयंत भावे, रिक्षावाला संघटनेचे केशव क्षीरसागर यांसह मान्यवर उपस्थित होते.