विकसित भारत संवाद’ ऑनलाइन व्याख्यानमालेत विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

14

मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत राज्यातील सर्व विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमांत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत  पाटील यांनी केले आहे.

पाटील म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचे स्वप्न पाहिले आहे. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त विद्यापीठआणि महाविद्यालीन विद्यार्थ्यांना प्रेरित करून प्रत्येक क्षण विकसित भारताच्या विचाराने जगला पाहिजे यासाठी विकसित भारत २०४७ हा उपक्रम भारताच्या स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षापूर्वी देशाला विकसित राष्ट्र बनविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत आहे. यामाध्यमातून देशाचा आर्थिक, सामाजिक, पर्यावरणीय आणि प्रशासनिक क्षेत्रांतील विकास साधून भारताला एक आघाडीची जागतिक शक्तीशाली देश म्हणून उभे करण्याचा प्रयत्न आहे.

तरुणांच्या सहभागातून ‘विकसित भारत राजदूत युवा कनेक्ट’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाच्या विकास यात्रेला नवे बळ मिळेल. या कालावधीत आयोजित होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये ‘विकसित भारत संवाद’ ही ऑनलाइन व्याख्यानमाला विशेष आकर्षण असणार आहे. यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच रक्तदान शिबिरे, स्वच्छता अभियान, आरोग्य तपासणी शिबिरे, झिरो वेस्ट व्यवस्थापन, पर्यावरण जनजागृती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांवरील व्याख्याने, शहीद भगतसिंह जयंतीनिमित्त देशभक्तीपर कार्यक्रम, आरोग्यविषयक कार्यशाळा, निबंध, पथनाट्य अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाच्या निर्देशानुसार ‘स्वच्छता ही सेवा अभियान २०२५’ राज्यभरातील विद्यापीठे व महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत सार्वजनिक स्वच्छता मोहीम, सफाई मित्र सुरक्षा शिबिरे, स्वच्छ सुजल गाव, स्वच्छ आरोग्यदायी स्ट्रीट फूड यांसारख्या विशेष उपक्रमांचा समावेश असेल. विशेष म्हणजे, २५ सप्टेंबर रोजी ‘एक दिन, एक घंटा, एक साथ’ या घोषवाक्यांतर्गत श्रमदान मोहिमेत देशभरात नागरिक हातात हात घालून स्वच्छतेचा संकल्प करणार आहेत. याशिवाय, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या Apprenticeship Embedded Degree Programme (AEDP) संदर्भातील कार्यशाळाही राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये घेण्यात येणार आहे.‘विकसित भारत संवाद’ ही व्याख्यानमाला विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्यासपीठ असून तरुणांनी यात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.