पिंपरी चिंचवडच्या वाहतूक समस्येवर दीर्घकालीन नियोजन आराखडा तयार करा – मंत्री चंद्रकांत पाटील
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील वाढती लोकसंख्या व वाढती वाहनसंख्या विचारात घेऊन भविष्यात शहरामध्ये वाहतूक कोंडीसारख्या समस्या निर्माण होऊ नयेत, यासाठी आगामी १५ वर्षांचा विचार करून महापालिकेने नियोजन आराखडा तयार करावा, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांची आढावा बैठक आज महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील माजी महापौर मधूकर पवळे सभागृहात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, वाहतूक व्यवस्था, नदी पुनरुज्जीवन प्रकल्प, आरोग्य व्यवस्था, वैद्यकीय व्यवस्था आदी सोयीसुविधांबाबत करण्यात येत असलेल्या कामाचा आढावा बैठकीमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला.
चंद्रकांत पाटील म्हणाले, शहरातील कचरा, सांडपाणी, वाहतूक असे प्रश्न सोडवण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांना गती देण्यात यावी. रस्त्यांवरील खड्ड्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात यावे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाण्याचा पुनर्वापर करण्यावर भर द्यावा. फुटपाथ अतिक्रमणमुक्त राहतील, यासाठी सुयोग्य नियोजन करावे, अशा सूचनाही मंत्री पाटील यांनी दिल्या. पिंपरी चिंचवड शहरामध्ये वाढणारी वाहनसंख्या लक्षात घेऊन वाहतूक कोंडीसारख्या समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. भविष्यात ही समस्या गंभीर होऊ नये, यासाठी पुढील १५ ते २० वर्षांचा विचार करून वाहतूक नियोजन आराखडा तयार करण्याची आवश्यकता आहे. तसेच तात्काळ उपाययोजनांसाठी पोलीस विभागाशी समन्वय साधून सिग्नल दुरुस्तींसह वाहतूक नियोजनासाठी इतर उपाययोजना करण्यास प्राधान्य द्यावे, असेही पाटील म्हणाले.
या बैठकीला अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांबळे-पाटील, विजयकुमार खोराटे, श्रीमती तृप्ती सांडभोर यांच्यासह सर्व विभाग प्रमुख तसेच, आमदार शंकर जगताप, महेशदादा लांडगे, उमाताई खापरे, माजी आमदार अश्विनी वहिनी जगताप, भाजपा अध्यक्ष शत्रुघ्न कांटे आणि माजी नगरसेवक उपस्थित होते.