महापालिकेत महायुतीची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी सर्वांनी दृढ निश्चयाने, समन्वयाने आणि जोमाने कामाला लागा – मंत्री चंद्रकांत पाटील
कोल्हापूर : कोल्हापूर येथे आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांसमवेत सविस्तर चर्चा केली. यासोबतच महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे आमदार व राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यासह शिवसेनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांसोबत देखील निवडणुकी संदर्भात संवाद साधला.
महापालिकेत महायुतीची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी सर्वांनी दृढ निश्चयाने, समन्वयाने आणि जोमाने कामाला लागावे, अशा सुचना यावेळी पाटील यांनी केल्या. महापालिका निवडणुकीत महायुतीचा विजय निश्चित करण्यासाठी परस्पर समन्वय, संघटन बळकटीकरण आणि संयुक्त रणनीती यावर सविस्तर संवाद साधण्यात आला.
या प्रसंगी पश्चिम महाराष्ट संघटन मंत्री मकरंद देशपांडे, आमदार अमल महाडिक, प्रदेश सचिव महेश जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, माजी नगरसेवक प्रा. जयंत पाटील, राहुल चिकोडे आदी मान्यवर उपस्थित होते.