अमेरिका आणि युरोपियन युनियनसोबतच्या करारांमुळे महाराष्ट्राला मोठा फायदा – मंत्री चंद्रकांत पाटील
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणात्मक रणनीतीमुळे भारताने जागतिक व्यापार क्षेत्रात दोन ऐतिहासिक शिखरे सर केली आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत झालेला व्यापार करार आणि मागील आठवड्यात युरोपियन युनियनसोबत (EU) झालेला ‘मुक्त व्यापार करार’ (FTA) यांमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला नवी गती मिळणार आहे. या यशाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उत्स्फूर्त स्वागत केले आहे.
भारत आणि युरोपियन युनियनमधील करारामुळे युरोपातील २७ देशांमध्ये भारतीय निर्यातीला शून्य-शुल्क (Zero-duty) प्रवेश मिळाला आहे. यामुळे ५ ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेचे स्वप्न वेगाने पूर्ण होईल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. दोन मोठ्या लोकशाहीवादी देशांमधील या करारामुळे जागतिक स्थैर्याला बळ मिळणार आहे. अमेरिकन बाजारपेठेत भारतीय उत्पादनांना मिळणारी संधी भारताची निर्यात साखळी मजबूत करेल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र हे उत्पादन, सेवा आणि कृषी निर्यातीत देशात आघाडीवर आहे. या नवीन करारांमुळे राज्यातील ऑटोमोबाईल, आयटी आणि कृषी प्रक्रिया उद्योगांना निर्यातीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. “महाराष्ट्राच्या प्रगतीत हा करार मैलाचा दगद ठरेल,” असे पाटील यांनी आवर्जून नमूद केले.
जेव्हा जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्था आणि जगातील दोन मोठे लोकशाहीवादी देश एकत्र येऊन व्यापार करतात तेव्हा त्याचा फायदा केवळ दोन्ही देशातील नागरिकांनाच नव्हे तर जागतिक स्थैर्याला सुद्धा होतो. या व्यापार करारामुळे आपल्या देशात तयार होणाऱ्या उत्पादनाची व इतर मालाची निर्यात साखळी मजबूत होईल. भारताच्या प्रगतीत योगदान देणारा आपला महाराष्ट्र उत्पादन, सेवा क्षेत्र, कृषी संबंधित माल यासारख्या क्षेत्रात नेहमीच निर्यातीतही मोठा वाटा उचलतो. त्यामुळे महायुती सरकारचे कॅप्टन, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रालाही या कराराचा सर्वाधिक फायदा होईल.
युरोपियन युनियन आणि आता अमेरिका यांच्यासोबत व्यापार करार करण्यात आलेले यश हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणात्मक रणनीतीचे यश आहे. याबद्दलपाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे १४० कोटी समस्त भारतीयांच्या वतीने अभिनंदन केले.