नव्या पिढीला प्रेरणा देणारे कार्य! पुण्याच्या शोकसभेत अजितदादांच्या कर्तृत्वाचा सन्मान

20

पुणे : महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व आणि दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर आज बालगंधर्व रंगमंदिर येथे पुणेकरांच्या वतीने श्रद्धांजलीपर शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या शोकसभेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभागी होत स्वर्गीय अजितदादांना श्रद्धांजली अर्पण केली आणि त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

यावेळी राजकीय क्षेत्रासह साहित्य, कला, क्रीडा, सांस्कृतिक, प्रशासकीय, शैक्षणिक, उद्योग, व्यापार अशा विविध क्षेत्रातील नागरिकांनी दादांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार सचिन अहिर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार सचिन अहिर, माजी आमदार उल्हास पवार, ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, चित्रपट दिगदर्शक नागराज मंजुळे, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

या वेळी त्यांच्या सहवासातील अनेक आठवणींना उजाळा देताना सार्वजनिक जीवनातील त्यांची कार्यतत्परता, सर्वसामान्यांप्रती असलेली कणव आणि कर्तव्यनिष्ठा पुन्हा अधोरेखित झाली. मंत्रिमंडळ बैठका असोत किंवा प्रशासकीय कामकाज प्रत्येक संवादातून त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व अनुभवायला मिळत असे. त्यांचे समर्पित कार्य आणि जनसेवेची वृत्ती नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल, असे पाटील म्हणाले.

पाटील म्हणाले, सत्तेत असो व नसो दादांच्या लोकप्रियतेत आणि त्यांच्या कामात कधीही खंड पडला नाही. त्यांनी परिणामांची कधी काळजी केली नाही. शरद पवार यांच्याबद्दल ते कमालीचे हळवे होते. त्यांच्या कुटुंबियांच्या मागे उभे राहून त्यांचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करण्याची जबाबदारी आपली आहे, असे मत देखील पाटील यांनी व्यक्त केले.

मुरलीधर मोहोळ यावेळी म्हणाले, विकासाच्या बाबतीत कधीही राजकारण न करणारा नेता म्हणजे अजितदादा होते. महाविकास आघाडीचं सरकार असो वा महायुतीचं, पुण्याच्या विकासासाठी त्यांनी नेहमीच पक्षीय भिंती ओलांडून काम केलं. याचा मी स्वतः साक्षीदार आहे आणि याबद्दल मी अनेकदा जाहीरपणे बोललो आहे. कोविडसारख्या भीषण संकटाच्या अडीच वर्षांच्या काळात दादा जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि मी शहराचा महापौर म्हणून जबाबदारी सांभाळत होतो. त्या काळात त्यांनी दाखवलेली संवेदनशीलता आणि तत्परता कधीही विसरता येणार नाही.

Get real time updates directly on you device, subscribe now.