राऊळगाव स्फोटक कारखाना दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून शोक व्यक्त

7

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव येथील एका स्फोटकांच्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात १७ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून १८ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी असून, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

राऊळगाव येथील कारखान्यात अचानक झालेल्या स्फोटामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की यामध्ये १७ जणांना आपले प्राण गमवावे लागले. या दुर्घटनेत १८ जण जखमी झाले असून त्यांच्यावर नागपूर येथील रुग्णालयात तातडीने उपचार सुरू आहेत. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना पाटील यांनी केली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दोषींवर कडक कारवाई करण्याचे संकेतही प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

राऊळगावची ही घटना अत्यंत वेदनादायक आहे. आपल्या हक्काची माणसे गमावल्यामुळे संबंधित कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या कठीण प्रसंगात सरकार पूर्णतः त्यांच्या पाठीशी उभे आहे. मी मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशा शब्दांत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.