मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून ज्येष्ठांसाठी आरोग्य मंत्र; डॉ. मीनाक्षी पंडित यांचे मोलाचे मार्गदर्शन
पुणे : जागतिक महिला दिनानिमित्त, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘निसर्ग छाया’ (भूगाव) येथे महिलांसाठी एका विशेष आरोग्यविषयक मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. वाढत्या वयातील शारीरिक बदलांना सामोरे जाताना ‘६० वर्षांनंतरही वेदनामुक्त आणि आनंदी जीवन कसे जगावे?’ या विषयावर तज्ज्ञांनी महिलांशी संवाद साधला.
प्रसिद्ध मार्गदर्शिका डॉ. मीनाक्षी पंडित यांनी या सत्रात प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. उतारवयात उद्भवणाऱ्या सांधेदुखी, आहार, मानसिक आरोग्य आणि व्यायामाचे महत्त्व त्यांनी सोप्या भाषेत पटवून दिले. “केवळ आयुष्य वाढवणे महत्त्वाचे नसून, ते आनंदी आणि वेदनामुक्त असणे जास्त गरजेचे आहे,” असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.
या सत्रात कोथरूड आणि भूगाव परिसरातील अनेक ज्येष्ठ महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. महिलांनी आपल्या आरोग्याविषयीच्या शंकांचे निरसन करून घेतले. आरोग्यविषयक व्यायामाच्या काही सोप्या कृतीही यावेळी करून घेण्यात आल्या, ज्यामुळे कार्यक्रमात एक वेगळाच उत्साह दिसून आला.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या उपक्रमाच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करत उपक्रमासाठी विशेष मेहनत घेणाऱ्या सौ. अमृता देवगांवकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनापासून कौतुक केले. महिलांचे आरोग्य हा समाजाचा कणा असून, अशा मार्गदर्शन सत्रांमुळे महिलांमध्ये स्व-आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण होत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.