महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देणे, हा माझा नेहमीच आग्रह – मंत्री चंद्रकांत पाटील

5

पुणे  : महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या हातातील कौशल्याला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘उत्कर्ष आणि उन्नती फाउंडेशन’च्या वतीने आयोजित महिला उद्योजिकांच्या ‘भव्य प्रदर्शन व विक्री केंद्राचे’ उद्घाटन आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. गुढीपाडव्याचे औचित्य साधून गांधी भवन मैदान येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन महिला उद्योजिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या उत्पादनांचे कौतुक केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देणे, हा माझा नेहमीच आग्रह असतो. त्या अनुषंगाने आयोजित हे प्रदर्शन म्हणजे महिलांच्या उत्पादनांसाठी मिळलेलं उत्तम व्यासपीठ आहे.

हे प्रदर्शन आज दिवसभर सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत सर्व नागरिकांसाठी खुले आहे. कोथरूडमधील जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी आणि महिला उद्योजकांनी तयार केलेल्या वस्तूंची खरेदी करून त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे कळकळीचे आवाहनही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केले.
या प्रदर्शनात हस्तकला, घरगुती खाद्यपदार्थ, दागिने आणि विविध नाविन्यपूर्ण वस्तूंचे स्टॉल्स लावण्यात आले असून, कोथरूडकरांचा याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

यावेळी संयोजिका अमृता देवगावकर, नगरसेविका ॲड. वासंती जाधव, ॲड. मिताली सावळेकर, ज्योत्स्ना कुलकर्णी, मनीषा बुटाला, रोहिणी चिमटे, रुपाली पवार, रेश्मा बराटे, नगरसेवक दिनेश माथवड कोथरुड दक्षिण मंडल अध्यक्ष गिरीश खत्री ह्यांच्यासह भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.