डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी ‘स्नेहसंवाद’ सोहळ्याचे आयोजन
पुणे: भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार, १४ एप्रिल रोजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड येथील ‘देवाशिष’ निवासस्थानी अभिवादन व स्नेहसंवाद सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा दिवस हा चैतन्य आणि प्रेरणेचा दिवस असून, त्यांच्या बुद्धी, तर्क आणि करुणेच्या विचारांचा जागर करण्यासाठी या विशेष कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत होणाऱ्या या अनौपचारिक सोहळ्यात विविध क्षेत्रांतील मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी होऊन महामानवाच्या स्मृतींना अभिवादन करणार आहेत.
यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील स्वतः उपस्थितांशी संवाद साधणार असून, महामानवाचे विचार राष्ट्रनिर्मितीसाठी कसे दिशादर्शक आहेत, यावर चर्चा होईल. कोथरूडमधील महात्मा सोसायटी येथील त्यांच्या निवासस्थानी होणाऱ्या या सोहळ्यास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.