महाबळेश्वर: आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ गाडी १००० फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात; साताऱ्यातील ८ तरुणांचा जागीच मृत्यू, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली

13

पोलादपूर : पोलादपूर आणि महाबळेश्वर दरम्यान असलेल्या निसर्गरम्य मात्र धोकादायक अशा आंबेनळी घाटात आज पहाटे एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारा अपघात झाला. साताऱ्यातील आसगाव येथील तरुणांची स्कॉर्पिओ गाडी अनियंत्रित होऊन थेट १००० फूट खोल दरीत कोसळली. या अत्यंत दुर्दैवी अपघातात गाडीतील सर्वच्या सर्व ८ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातील आसगाव येथील हे ८ तरुण कोकणातील दापोली आणि हर्णे भागात पर्यटनासाठी गेले होते. कोकण सहल आटोपून परतीच्या प्रवासात असताना आज पहाटे आंबेनळी घाटातील एका तीव्र आणि अत्यंत धोकादायक वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटल्याने ही स्कॉर्पिओ गाडी थेट खोल दरीत कोसळली आणि हा भीषण अपघात घडला.

गाडी तब्बल १००० फूट खोल दरीत कोसळल्यामुळे मृतदेह आणि गाडीचे अवशेष वर आणण्यासाठी बचाव पथकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन, एनडीआरएफ (NDRF), रायगड व सातारा पोलीस दल, तसेच स्थानिक स्वयंसेवी बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली असून युद्धपातळीवर मदतकार्य सुरू आहे. खोल दरी आणि कठीण चढणीमुळे मृतदेह बाहेर काढण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागत आहेत. आतापर्यंत काही मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात यश आले असून उर्वरित मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत.

या भीषण दुर्घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तीव्र दुःख व्यक्त करत मृत तरुणांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी म्हटले कि, साताऱ्यातील आसगाव येथील तरुणांच्या स्कॉर्पिओ गाडीचा आंबेनळी घाटात झालेला भीषण अपघात अत्यंत वेदनादायी आणि धक्कादायक आहे. या दुर्घटनेत जीव गमावलेल्या सर्व मृत तरुणांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. हा प्रसंग अतिशय कठीण असून आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागाी आहोत. ईश्वर दिवंगत आत्म्यांना चिरशांती देवो आणि त्यांच्या माता-पित्यांना व कुटुंबियांना या प्रचंड दुःखातून सावरण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना.

या भीषण अपघातामुळे आसगाव परिसरासह संपूर्ण सातारा जिल्ह्यावर आणि मृत तरुणांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.