चाळीसगाव येथील केकी मूस कलादालनाला मंत्री चंद्रकांत पाटील यांची सदिच्छा भेट; कलाठेव्याच्या जतनासाठी सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही
जळगाव, २५ नोव्हेंबर : चाळीसगाव येथील प्रसिद्ध केकी मूस कलादालनाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी केकी मूस यांच्या अजरामर कलाकृतींची बारकाईने पाहणी करून त्यांच्या अद्वितीय कलाप्रवासाची माहिती जाणून घेतली, तसेच या कलादालनाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी व कलाकृतींच्या जतनासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
कलादालनाची पाहणी केल्यानंतर भावना व्यक्त करताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, “चाळीसगावच्या सांस्कृतिक वैभवाचा मानबिंदू असलेला हा अनमोल कलाठेवा पिढ्यान्पिढ्या जतन आणि संवर्धित राहणे काळाची गरज आहे. या कलादालनाच्या सर्वांगीण विकासासाठी व येथील कलाकृतींच्या संवर्धनासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल.”
या सदिच्छा भेटीप्रसंगी आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह संस्थेचे विश्वस्त, पदाधिकारी, स्थानिक कलाप्रेमी व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.