चाळीसगावमधील ‘स्वयंदीप’ दिव्यांग महिला निवासी रोजगार प्रकल्पाला मंत्री चंद्रकांत पाटील यांची सदिच्छा भेट; दिव्यांग भगिनींच्या जिद्दीचे केले कौतुक
जळगाव, २५ नोव्हेंबर : चाळीसगाव एमआयडीसी (MIDC) परिसरातील ‘स्वयंदीप’ दिव्यांग महिला निवासी रोजगार प्रकल्पाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन तेथील विविध उपक्रमांची पाहणी केली. यावेळी प्रकल्पात कार्यरत असलेल्या दिव्यांग भगिनींनी केलेले आत्मीय स्वागत पाहून भारावून गेल्याची भावना मंत्री पाटील यांनी व्यक्त केली.
या भेटीदरम्यान पाटील यांनी प्रकल्पातील महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध रोजगार संधींची सविस्तर माहिती जाणून घेतली. तसेच, या दिव्यांग भगिनींच्या अदम्य जिद्दीचे व आत्मनिर्भरतेच्या प्रवासाचे मनापासून कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
प्रकल्पाच्या कार्याचा गौरव करताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, “दिव्यांग भगिनींना केवळ सहानुभूती नव्हे तर स्वाभिमानाने जगण्याची संधी देणारा ‘स्वयंदीप’चा हा उपक्रम संपूर्ण समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. अशा सेवाभावी आणि विधायक कार्याला पाठबळ देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे.”
या सदिच्छा भेटीप्रसंगी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, संस्थेच्या संस्थापिका मीनाक्षीताई निकम, भरत अमळनेर यांच्यासह प्रकल्पाचे पदाधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.