राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबत प्रात्यक्षिक, कौशल्याधारित आणि रोजगाराभिमुख शिक्षण मिळणे आवश्यक – मंत्री चंद्रकांत पाटील
जळगाव : जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विविध शैक्षणिक सुविधा व विकासकामांचे भूमिपूजन तसेच उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उत्सहात संपन्न झाले. यावेळी प्रस्तावित मुलांचे वसतिगृह क्र. ४, ‘सेंटर फॉर ट्रेनिंग फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन’, ‘सोफिस्टिकेटेड अॅनॅलिटिकल इन्स्ट्रुमेंटेशन फॅसिलिटी सेंटर’च्या फेज-१ इमारतीचे भूमिपूजन, तसेच पीएम-उषा निधीतून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक कंटेंट स्टुडिओ आणि नंदुरबार येथील आदिवासी अध्यासन केंद्राचे देखील ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले कि, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानासोबत प्रात्यक्षिक, कौशल्याधारित आणि रोजगाराभिमुख शिक्षण मिळणे आवश्यक आहे. आधुनिक तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रशिक्षण देत विद्यार्थ्यांना भविष्यातील रोजगार आणि उद्योजकतेच्या संधींसाठी सक्षम करण्यावर भर आहे. ‘कमवा व शिका’ योजनेची व्याप्ती वाढवून तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे देखील पाटील यांनी म्हटले.
या कार्यक्रमास विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, विद्यापीठ सल्लागार समितीचे अध्यक्ष अशोक जैन, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. पराग मसराम, कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.