निर्माता पुनीत बालन यांचा मदतीचा हात

पुण्यातील प्रसिद्ध एस. बालन ग्रुपचे अध्यक्ष, उद्योजक, चित्रपट निर्माते पुनीत बालन यांनी पुण्यातील सिने – नाट्य सृष्टीतील बॅकस्टेज आर्टिस्ट, ज्युनियर ऍक्टर यांच्या साठी तब्बल पाच लाख रुपयांची देणगी अखिल भारतीय चित्रपट महामंडळास तर अडीच लाख रुपयांची मदत ‘ मुळशी पॅटर्न ‘ चित्रपट चित्रीकरणास असणाऱ्या बॅकस्टेज टीमसाठी दिली आहे. महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांच्याकडे विनंती करत, पुण्यातील सिने – नाट्यक्षेत्र, दूरचित्रवाणी व सांस्कृतिक क्षेत्रातील बॅकस्टेज आर्टिस्ट आणि ज्युनियर ऍक्टर यांना हि रक्कम वितरीत करावी जेणेकरून त्यांना किमान एक महिन्यासाठी किराणामाल, जीवनावश्यक वस्तू खरेदी करता येतील.” तसेच भविष्यात लॉकडाऊनचा कालावधी वाढला तर आम्ही या सर्व कामगारांना आणखी मदत करणार आहोत.” असेही पुनीत बालन म्हणाले. मुळशी पॅटर्न चित्रपटाचे लेखक – दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या मदतीच्या अहवानाला प्रतिसाद देत त्यांनी हि मदत केली आहे.
पुनीत बालन हे पुण्यातील एक प्रतिष्ठित युवा उद्योजक असून पुणे शहरातील तसेच महाराष्ट्रातील अनेक सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमास त्यांचे वेळोवेळी सहकार्य असते. त्यांनी पुण्यातील कलाकारांसाठी केलेल्या मदतीचे कौतुक चित्रपट सृष्टीतून करण्यात येत आहे.