मनसे महिला कार्यकारिणीत फेरबदल; पुणे शहर अध्यक्ष पदी माजी नगरसेविका वनिता वागस्कर

पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे येथील महिला कार्यकारिणीत फेरबदल करण्यात आले आहे. यामध्ये पुणे शहर अध्यक्ष पदी माजी नगरसेविका वनिता वागस्कर यांची नियुक्ती करण्यात आली. तर विद्यमान महिला अध्यक्षा ऍड. रुपाली पाटील यांच्याकडे राज्याच्या महिला उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

तसेच उपशहर अध्यक्ष पदी पदमीनी साठे, जयश्री पाथरकर, अस्मिता शिंदे ह्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी पक्षाचे नेते अनिल शिदोरे, राजेंद्र वागस्कर, शहराध्यक्ष वसंत मोरे, माजी शहराध्यक्ष रुपाली पाटील, पक्षाचे सरचिटणीस, उपाध्यक्ष, विभाग अध्यक्ष व माजी नगरसेवक उपस्थित होते.

पुणे महानगर पालिकेची निवडणूक राज ठाकरे यांनी मनावर घेतल्याचे दिसत आहे. ठाकरे यांनी गेल्या तीन महिन्यत तब्बल आठवेळा पुणे दैरा केला आहे. तसेच पश्‍चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून संघटना बांधणीच्या कामाचा आढावा घेतला आहे.

मनसेच्या स्थापनेनंतर पक्षाला सर्वाधिक प्रतिसाद नाशिक आणि पुण्यातून मिळाला. पुण्यात मनसेचे तब्बल २९ नगरसेवक निवडून आले होते. पहिल्या झटक्यात मनसे पुणे महापालिकेत विरोधी पक्ष म्हणून उदयास आला होता. मात्र, २०१७ च्या निवडणुकीत पक्षाची पीछेहाट झाली. त्यामुळे संघटना बांधणीवर लक्ष देऊन येत्या निवडणुकीत पुण्यात पक्षाची ताकद वाढविण्याचे ठाकरे यांचे प्रयत्न आहेत.