अजित पवारांच्या उपस्थितीत रूपाली पाटील ठोंबरेंचा राष्ट्रवादीत प्रवेश!

मुंबई: पुण्याच्या फायरब्रँड नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी मनसेला रामराम ठोकल्यानंतर अखेर मनगटावर घड्याळ बांधलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत रूपाली पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. मुंबई अजित पवारांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

रूपाली पाटील ठोंबरे मनसेमधून  बाहेर पडल्यावर कोणत्या पक्षात प्रवेश करणार याकडे सर्वांचच लक्ष लागलं होतं. रूपाली पाटील यांनी युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांची भेट घेतल्याने त्यांच्या शिवसेना प्रवेशाची शक्यता वर्तवली जात होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत रूपाली पाटील ठोंबरे यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. रूपाली पाटील यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षातून ऑफर असल्याचा खुलासा केला होता.

राजीनामा दिल्यानंतर रुपाली पाटील काय म्हणाल्या ?

मी मनसेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.  राज ठाकरे यांना पाहून राजकारणात आले. मला कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्याबद्दल वाईट बोलणार नाही. ती माझी वृत्ती नसल्याचे पाटील यांनी सांगितले. राजीनामा देण्याआधी माझ्या मनातील खदखद राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहचवली आहे. काही अपरिहार्य कारणांमुळे राजीनामा दिला असल्याची कबुली त्यांनी दिली. मुंबईत काही कामानिमित्त मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि युवा सेना नेते वरूण सरदेसाई यांची भेट झाली असल्याचे रुपाली पाटील यांनी म्हटले.