राष्ट्रवादीच्या आमदाराला भर चौकात ठार मारण्याची धमकी; निनावी पत्राने खळबळ

पुणे: जिल्ह्यातील शिरूर-हवेली मतदारसंघाचे आमदार अशोक पवार यांना जीवे मारण्याच्या धमकीचे निनावी पत्र आल्याने एकच खळबळ उडाली आहे. शिरूर शहरातील अनेक नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोस्टाद्वारे हे पत्र आले आहे. या पत्रात उद्योजक प्रकाश धारिवालांसह नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांबद्दल अपशब्द वापरण्यात आले आहे.

या पत्रात आमदार अशोक पवार यांचा महेंद्र मल्लाव करण्याची धमकी देण्यात आली आहे. काही वर्षापूर्वीच शिरूरचे नगरसेवक महेंद्र मल्लाव यांची भर चौकात दिवसा हत्या करण्यात आली होती. त्यामुळे आमदार अशोक पवार यांनाही भर चौकात जीवे मारण्याची धमकी या पत्रातून देण्यात आली आहे. या धमकीपत्रानंतर शिरुर-हवेली मतदारसंघात तीव्र पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे.

दरम्यान, या निनावी पत्रात आमदार अशोक पवार यांच्याविरोधात अनेक गंभीर आरोपही करण्यात आले आहेत. अशोक पवार यांनी भूखंड लाटला असून विकासकामांधील अनेक कोट्यावधी रुपयांचा घोटाळा करण्यात आल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे. आमदार पवार यांच्या पत्नी देखील नगरपालिकेच्या कामांमध्ये लुडबूड करत आहेत असा आरोप करण्यात आला आहे.