आदरणीय मुख्यमंत्री महोदय, संत मुक्ताईच्या भूमीत महिला सुरक्षित राहतील ना?

जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्याचा सर्व स्तरावरून निषेध करण्यात येत आहे. या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. यासंदर्भात रोहिणी खडसे यांनी स्वतः ट्वीट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रश्न केला आहे. मुख्यमंत्री महोदय, संत मुक्ताईच्या भूमीत महिला सुरक्षित राहतील ना? असा सवाल त्यांनी ट्विटच्या माध्यमातून विचारला आहे.

माहितीनुसार, चांगदेव येथून एका कार्यक्रमातून घरी येत असताना सूत गिरणी रस्त्यावर अज्ञातांनी रात्री ९.३० च्या सुमारात रोहिणी खडसे यांच्या गाडीवर हल्ला केला. राजकीय कटातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे. रोहिणी या चांगदेव येथून हळदीचा कार्यक्रम आटोपून कोथळी, मुक्ताईनगर येथे येत होत्या. यावेळी अज्ञात लोकांनी त्यांच्या गाडीवर रॉडने हल्ला केला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. पोलीस या घटनेतील हल्लेखोरांचा तपास घेत आहे.

दरम्यान, रोहिणी खडसे यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याचा राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्वीट करून तीव्र निषेध केला आहे. ‘एक महिला सक्षमपणे मतदारसंघात काम करीत असताना असे भ्याड हल्ले करणारे निर्दोष सुटता कामा नये, मग ते कोणीही असो. जळगाव पोलीस अधीक्षकांनी तातडीने हल्लेखोरांचा तपास करुन कडक कारवाई करावी’ अशी मागणी चाकणकर यांनी ट्विट करत केली आहे.