पंकजा मुंडे दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह, ओमिक्रॉनची लागण झाल्याची माहिती!

5

मुंबई: राज्यामध्ये कोरोनाने पुन्हा डोकं वर काढले आहे. कोरोनाचा  प्रादुर्भाव वाढत चालला असून दिवसेंदिवस रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना रुग्णांसोबतच ओमिक्रॉनबाधितांची संख्या देखील वाढत आहे. त्यामुळे चिंता आणखी वाढत चालली आहे. राज्यातील 10 मंत्री आणि 20 आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. अशामध्ये आता माजी मंत्री आणि भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे  यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. पण यावेळी त्यांना कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनची लागण झाली आहे.

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी स्वत: ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की, ‘कोरोनाबाधित लोकांच्या संपर्कात आल्याचे जाणवल्या बरोबर मी विलग झाले आहे. चाचणी केली. लक्षणं आणि कोरोना दोन्ही आहेत. सर्वांनी काळजी घ्यावी.’, असे आवाहन त्यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे यांना कोरोनाची लागण झाली. तसंच राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. राज्यातील राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.

दरम्यान, राज्यात कोरोनाने पुन्हा हात-पाय पसरायला सुरुवात केली आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामध्ये ओमिक्रॉनबाधितांची देखील भर पडत आहे. ही कोरोनाची तिसरी लाट असल्याचे म्हटले जात आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून आवश्यक ती पावलं उचलली जात आहेत. अशामध्ये गेल्या 24 तासांत राज्यात 9,170 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. एकट्या मुंबईमध्ये 6, 347 कोरोनाचे रुग्ण आहेत. तर दिवसभरामध्ये सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यात 24 तासांत 8 ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळले आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.