एसटी कर्मचारी संपावर ठाम; औरंगाबाद, सोलपुरातही 23 जणांचे निलंबन

औरंगाबाद: राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्यात यावे या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून एसटीचे कर्मचारी १४ दिवसापासून संपावर आहेत. तसेच कर्मचाऱ्यांकडून सरकार विरोधात आंदोलन सुरू आहेत. या आंदोलनात आता भाजपाने उडी घेतल्याने संप अधिक चिघळला आहे. एसटी कर्मचारी संपावर अद्याप तरी ठाम आहेत.

जो पर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा पवित्रा एसटी कर्मचाऱ्यांनी घेतलाय. तर ऐण सणासुदीत प्रवाशांचे हाल होत असल्यामुळे राज्य सरकारने मागील काही दिवसांपासून कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचा धडाका लावलाय. औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यातील 15 एसटी कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. तर सोलापुरातदेखील आठ कर्मचाऱ्यांवरदेखील कारवाई करण्यात आलीय. राज्यात आतापर्यंत तीनशेपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचे निलबंन राज्य सरकारने केले आहे.

राज्यभर पुकारलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप औरंगाबादेतदेखील सुरु आहे. मात्र येथील 15 संपकऱ्यांवर राज्य सरकारने निलंबनाची कारवाई केली आहे. यामध्ये बुधवारी दहा तर मंगळवारी 5 जणांविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले असून कोणतीही कारवाई केली तरी आमचे आंदोलन सुरुच राहील अशी भूमिका संपकऱ्यांनी घेतली आहे.

तर दुसरीकडे सोलापूर आगारातील 8 एसटी कर्मचाऱ्यांचेदेखील निलंबन करण्यात आलेय. या एसटी कर्मचाऱ्यांनी मंत्रालयाच्या बाहेर जाऊन आक्रोश केला होता. सोलापुरातील जवळपास 200 हून अधिक कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदविला होता. या कारवाईनंतर आता राज्य सरकारवर टीका होत असून आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र आम्ही संपावर कायम राहणार आहोत, अशी भूमिका सोलापुरातील कर्मचाऱ्यांनीदेखील घेतली आहे.