अमरावतीमध्ये बंदला हिंसक वळण! 144 कलम लागू, जमावानं टपरी जाळली

12

अमरावती: गेल्या महिन्यात त्रिपुरातील हिंसाचाराचा वणवा आता महाराष्ट्रात पोहोचला आहे. आजही राज्यात हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत. अमरावती, नांदेड आणि नाशिक या तीनही शहारांमध्ये वातावरण चिघळं असून अमरावतीच्या राजकमल चौकात मोठ्या संख्येने जमाव एकवटला असून दुकानांची तोडफोड केली जात आहे. शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन पोलिस आणि पालकमंत्र्यांनी केलेले असूनही जमावाकडून हिंसक घटना घडत आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी अमरावतीत कलम 144 लागू केले आहे.

आज सकाळी अमरातीत मोठ्या संख्येने जमावाने रस्त्यावर उतरत घोषणाबाजी केली. तर शहरातील राजकमल चौक परिसरातील एका टपरीलाही एका जमावाने आग लावली. या टपरीतील सामान आधी काढून घेण्यात आले होते. मात्र भर बाजारातील या टपरीला आग लावल्याने परिसरात धूर आणि आगीचे मोठे लोट उठताना दिसत होते. दरम्यान हा प्रकार थांबवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधूराचा वापर केला. त्यानंतर जमाव पांगला गेला.

नागपूरचे डीआयजी संदीप पाटील स्वतः रस्त्यावर उतरून आंदोलकांना आवरण्याचं काम करत आहेत. अनेक ठिकाणी दुकाने आणि गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. राजकमल चौकामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन झाल्यामुळे बंदला अमरावतीमध्ये हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळते.

अमरावतीत आज कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. काल घडलेल्या हिंसाचारातील दोषींवर आधी कारवाई करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी येथील भाजप नेत्यांनी केली आहे. त्याशिवाय रस्त्यावर उतरलेला जमाव पांगणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. तसेच राज्यातील सरकारविरोधात सर्व पक्षांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन भाजप नेत्यांनी केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.