पोलीस विभागाच्या सक्षमीकरणासाठी शहर व ग्रामीण पोलीस विभागाच्या मागणीनुसार भरीव निधी उपलब्ध करुन दिला जाईल – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
अमरावती : जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर अनुदानातून अमरावती पोलीस अधीक्षक कार्यालय ग्रामीण यांच्यासाठी 35 चारचाकी तसेच 15 मोटर सायकल वाहन खरेदी करण्यात आले. या वाहनांचा हस्तांतरण सोहळा पोलीस कवायत मैदान येथे आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटले कि, समाजातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून गुन्हेगारांवर वचक ठेवण्याचे काम पोलीस विभाग सक्षमपणे अहोरात्र करीत असतो. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात या जबाबदाऱ्या पार पाडताना पोलीस विभागाला आवश्यक सर्व अत्याधुनिक सुविधा मिळणे आवश्यक आहे. यासाठी पोलीस विभागाच्या सक्षमीकरणासाठी शहर व ग्रामीण पोलीस विभागाच्या मागणीनुसार भरीव निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी येथे दिले.
खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे -पाटील, आमदार रवि राणा, निवेदिता दिघडे, विभागीय आयुक्त डॉ. निधि पांडेय, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, अमरावती शहर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी, अमरावती पोलीस अधीक्षक ( ग्रामीण )विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत मस्के आदी यावेळी उपस्थित होते. प्रारंभी पालकमंत्री व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडून व वाहनांच्या ताफ्याला हिरवी झेंडी दाखवून वाहने विभागाला हस्तांतरीत करण्यात आली.